Latest

Mathura Fire: मथुरा येथे फटाका स्‍टाॅलला भीषण आग; ४ गंभीर, अनेकजण जखमी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  उत्तर प्रदेशमधील मथुरामध्‍ये दिवाळीनिमित्त उभारण्‍यात आलेल्‍या फटाका स्‍टाॅल्‍सना आज (दि.१२) दुपारी अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४ जण गंभीर तर १५ हून अधिकजण जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे. (Mathura Fire)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील राय कसबा येथे दिवाळी निमित्त फटाक्यांचे मार्केट उभारण्यात आले होते. यामध्ये २४ तात्पुरते स्‍टाॅल उभारण्यात आले होते. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लोकांची वर्दळ होती. फटाक्यांच्या एका स्‍टाॅलला ही आग लागली आणि ती झपाट्याने इतर सहा दुकानांमध्ये पसरली. (Mathura Fire)

मथुरा येथील मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद बन्सल यांनी सांगितले की, "आम्हाला आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत अनेक लोक  जखमी झाले आहेत. यामध्ये काही तरुण देखील गंभीर भाजले गेले आहेत. आम्ही त्यांना वैद्यकीय उपचार देत आहोत."

 गाझियाबादमधील भंगाराच्या गोदामाला आग

उत्तर प्रदेशातील  गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भंगाराच्या गोदामाला देखील आज (दि.१२) दुपारी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच सुमारे ६अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यात यंत्रणेला यश आले असून, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT