Latest

सासवडमधील कचरावेचकांचे हत्याकांड माणुसकीला काळिमा

अमृता चौगुले

अमृत भांडवलकर

नारायणपूर : सासवड येथील कचरावेचकांच्या दुहेरी हत्याकांडात पोलिस, आरोग्य या यंत्रणांची गुन्हेगारी बेबंदशाही दिसून आली असून, या यंत्रणेतील अनेकांनी कमालीचा निष्काळजीपणा दाखविल्याने माणुसकीला काळिमा फासला गेला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणात आता लक्ष घातले असून, त्यांनी या गुन्हेगारी निष्काळजीपणाचाही पर्दाफाश करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

23 मे रोजी दुपारी दोनच्या दरम्यान अंडाभुर्जी गाडीचालक नीलेश जगताप याने तीन कचरावेचकांना बांबूने बेदम मारहाण केली व उकळते पाणी एकाच्या अंगावर टाकले. मारहाणीमुळे ते तिघेहीे तेथेच पडून होते. ही घटना सासवड पोलिस स्टेशनपासून 700 ते 800 मीटर अंतरावर घडली. सासवड पोलिसांना मात्र याचा थांगपत्ता लागला नाही. सासवड पोलिस किती सतर्क आहेत, याचे हे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल.

24 मे रोजी नीलेश जगताप याने ते तीन जण उठत नाहीत म्हणून त्यांना पुन्हा बांबूने मारहाण केली. सायंकाळी पाचच्या सुमारास काही व्यक्तींनी रुग्णवाहिकेसाठी 108 नंबरला फोन केला असता त्यांनी, 'आम्ही निरा येथे असून, येण्यास 2 ते 3 तास लागतील,' असे सांगितले. उकळते पाणी अंगावर पडलेला, मारहाणीने जखमी असलेला कचरावेचक माणूस 30 तास रस्त्याच्या कडेला तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिका पाठविण्यास विलंब का केला? याची जबाबदारी तेथील आरोग्य अधिकारी आणि तेथील इतर यंत्रणेची नव्हे का?

याचा शोध आता या तपास कामात घेण्याची गरज आहे. रात्री 8 वाजता सासवड पोलिसांना जाग आली आणि ते त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात फोन केल्यावर रुग्णवाहिका त्या ठिकाणी आली. त्या माणसाला ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याला मयत घोषित करण्यात आले. दुसर्‍या कचरावेचकाला 24 मे रोजी रात्री 9:00 वाजता उपचारांसाठी ससून (पुणे) येथे पाठविण्यात आले व तो 30 मे रोजी उपचार घेत असताना मरण पावला.

30 मे रोजी खुनाचा गुन्हा नोंद झाला व सुरुवातीला अनोळखी माणूस दारू पिऊन मयत, असे खोटे एफआयआर तयार करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांना असे का करावे वाटले, याचा शोध तपासात घेण्याची गरज आहे. वेळेत या कचरावेचकांना मदत का झाली नाही? उकळत्या पाण्याने कसे भाजल्याची कारणे पोलिसांनी का शोधली नाहीत? हलगर्जीपणा का केला? याचाही शोध घेण्याची गरज आहे.

सासवड पोलिस ठाण्याचे अधिकारी व तपासी अंमलदारांनी मृतदेह सासवड नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात एवढी तत्परता का दाखवली? संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी तो तातडीने का जाळला? या अतिघाईची कारणे शोधून यामागे नक्की काय दडले आहे? याचा पर्दाफाश होण्याची गरज आहे. ओळख न पटलेले मृतदेह फ्रीझरमध्ये तीन दिवस ठेवण्याचा नियम आहे. जेजुरी ग्रामीण रुग्णालयात फ्रीझरची सोय आहे. त्या फ्रीझरमध्ये दोन मृतदेह ठेवायची व्यवस्था आहे.

मग ते तातडीने नष्ट का करण्यात आले. नियमानुसार बेवारस मृतदेह जाळत नाहीत, तो पुरतात; कारण की त्याचे वारस अथवा नातेवाईक परत आले, तर ओळख पटविण्यासाठी त्या मृतदेहाची डीएनए चाचणी करता येते. मग हा मृतदेह जाळण्यात का आला? याचीही चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणास शासकीय यंत्रणा पूर्णपणे जबाबदार आहे.

त्यामध्ये सासवड पोलिस ठाण्याचे संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी, आरोग्य यंत्रणेतील घटक यांच्या हलगर्जीपणामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला, त्याचप्रमाणे सासवड ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्याधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना उपचार मिळाले नाहीत. अशी सर्व गुंतागुंत असल्याने या प्रकरणास जबाबदार असणार्‍यांवर कायद्याचा फास आवळण्याची गरज आहे. मुळात हे सर्व प्रकरण संगनमताने घडविण्यात आले आहे का? याचा तपास करण्याची गरज आहे.

या प्रकरणामध्ये सुरुवातीचा तपास हा सहायक पोलिस फौजदार सुनील चिखले यांच्याकडे होता. प्रकरणाची तीव्रता वाढल्यानंतर तपास पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सुरू केला. परंतु, प्रकरणातील गुंतागुंत पाहता पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सासवडला भेटी दिली आणि तातडीने तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्याकडे सोपविला. डॉ. देशमुख यांनी सासवड येथे भेट देत फिर्याद, तपासाची कागदपत्रे पाहिली. तपास अधिकारी बदलला. त्यामुळे हे प्रकरण काय कलाटणी घेणार, याकडे सार्‍यांचे लक्ष आहे.

अतिशय गंभीर राजकीय आरोप-प्रत्यारोप

या प्रकरणाला माजी मंत्री शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी वाचा फोडताना विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यावर आरोप केल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. प्रकरण पोलिसांवर दबाव आणून आमदारांनी दडपले, या प्रकरणात आमदार, त्यांचा एक सहकारी, सासवडचे पोलिस आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली आहे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शिवतारे यांनी निवेदन दिले आहे.

आमदार संजय जगताप यांनीही शिवतारे यांना तेवढेच जोरदार उत्तर दिले आहे. शिवतारे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांची आमदारकी गेल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते काहीही बरळतात, असे प्रत्युत्तर देत आ. जगताप यांनी, संबंधितांचे सर्व कॉल डिटेल्स तपासून सत्य जनतेसमोर येऊ द्या, असे सुनावले आहे. या घटनेशी माझा व माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याचा काहीही संबंध नाही. आमचे कॉल डिटेल्स तपासून सत्य जनतेसमोर येईल. जेजुरी व सासवड पोलिस स्टेशनच्या कारभारात माझा आणि माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याचा हस्तक्षेप होत नाही, असे जगताप म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT