हॉटेलमध्ये गेल्यानंतर मैत्रिणीला गुगल पे अॅपमधून पैसे पाठविण्याच्या बहाण्याने झालेली ओळख एका उच्चशिक्षित तरुणीला मोठी महागात पडली आहे. संबधित तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात खेचून ब्लॅकमेल करत त्याने व त्याच्या मित्राने सामूहिक लैंगिक अत्याचार केले. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे अत्याचाराचे चित्रिकरण करून त्याच्या तिसर्या मित्राला पाठवले. त्याने ते सोशल मिडीयावर व्हायरल करून तरुणीची बदनामी केली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे गतिमान करत या प्रकरणाला वाचा फोडून तिघांना जेरबंद केले. विकी ऊर्फ विकास विनायक राठोड (21, रा.शिवांश हाईट्स, शिंदेनगर, मारुंजी गाव, पुणे, मुळपत्ता, ता.पैठण, जि.औरंगाबाद), निखील प्रताप पाटील (31,रा.मातोश्री बिल्डींग, शिंदेनगर ,मारुंजी गाव, पुणे, मु.पो.खरोसा, ता.औंसा, जि.लातूर), अमर गोरखनाथ राठोड (23,रा.मु.पो.थापटी, तांडा, ता.पैठण, जि.औरंगाबाद ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित तरुणी शिक्षणाच्या निमित्ताने शहरातील खासगी वसतीगृहात वास्तव्य करते. रविवारी मेस बंद असल्याने ती मैत्रिणीसोबत जंगली महाराज रस्त्यावर हॉटेलमध्ये गेली होती. तिला मैत्रिणीला ऑनलाईन पाचशे रुपये पाठवायचे होते. मात्र तिच्याकडे ती सुविधा उपलब्ध नव्हती.
त्यामुळे तिने तेथे उपस्थित असलेला आरोपी विकी राठोडला पाठवण्यास सांगितले. त्याच्याकडून देखील पैसे गेले नाहीत. मात्र त्या दरम्यान दोघांची मैत्री झाली. त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. विकी आणी निखिल दोघेही नोकरीच्या शोधात पुण्यात आले आहेत. त्यांनी पीडितेशी जवळीक वाढवत अत्याचार केले. यानंतर त्याचे चित्रीकरण गावाकडील मित्र अमरला पाठवले होते. अमरने ते व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केले.
वारंवार आरोपी तरुणीला ब्लॅकमेल करत होते. शेवटी सतत होणार्या त्रासाला कंटाळून तिने शिवीजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तिच्यासोबत घडलेली आपबीती महिला अधिकार्यांना सांगितली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता त्याक्षणी पीडित मुलीकडून आरोपींची माहिती घेतली.
तातडीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके नेमुन आरोपींचा माग काढण्यात आला. आरोपींना ताब्यात घेतल्यावर विकी आणी निखीलने अत्याचार केल्याची कबुली दिली. विकीने व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ अमरला पाठविल्यानंतर त्याने तो सोशल मिडीयावर व्हायरल करून, पीडित तरुणीस धमकवल्याचे तपासात निष्पण झाले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरिक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने, उपनिरीक्षक अरविंद म्हस्के, अंमलदार अनिकेत भिंगारे, राहुल होळकर, तुकाराम म्हस्के, शरद राऊत व महिला पोलीस अमलदार मंगल काटे तसेच तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक अतुल क्षिरसागर यांच्या पथकाने केली.
हे ही वाचलं का?