Latest

आमदारांच्या घरीच शिजला मला संपविण्याचा कट : संजय मरकड

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  स्थानिक आमदारांच्याच सांगण्यावरून यापूर्वी मला मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून काढण्यात आले होते. मी या विरोधात न्यायालयात गेलो. मला न्याय मिळाला आणि पुन्हा अध्यक्ष झालो. आताही अध्यक्षपदावरून काढण्याचा हा कट आमदारांंच्या निवासस्थानीच विश्वस्तांच्या बैठकीत शिजला. मी भाजपचा पदाधिकारी असूनही मला मुद्दाम त्रास देण्याचा प्रकार सुरू असून, या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदारांविषयी तक्रार करणार आहे, असे मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी बुधवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत सांगितले.

मढी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या दोन गटात 14 डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मरकड बोलत होते. मला जीवे मारून टाकण्याचा कट होता, असा आरोपही मरकड यांनी या वेळी केला. भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, अंबादास आरोळे, देविदास मरकड, सदाशिव मरकड, अक्षय कुटे, प्रतीक काळदाते, गेणू पगारे, नितीन शेळके, फिरोज शेख आदी उपस्थित होते.
आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळून मरकड म्हणाले, की तालुक्यात आपल्याला प्रतिस्पर्धी होतो की काय? अशा भीतीने माझ्यावर जीवघेणा हल्ला करून मला संपविण्याचा प्रयत्न होता.

स्थानिक आमदार यामध्ये हस्तक्षेप करतात, असे म्हणणार्‍यांची बैठक आमदारांच्या निवासस्थानी 10 डिसेंबर रोजी झाली. त्या दिवसभराचे आमदारांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर आणा, म्हणजे कळेल की, त्या दिवशी मढी देवस्थानचे सगळे विश्वस्त काय करत होते? यावरूनच लक्षात येते की आमदाराचा मढी देवस्थानमध्ये खूप मोठा हस्तक्षेप आहे. त्यामुळे आमदाराच्या निवासस्थानामधूनच माझ्या हत्येचा कट रचला गेला. अशाप्रकारे कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर ही गंभीर बाब आहे. मी एक सच्चा कार्यकर्ता असून थांबणार्‍यापैकी नाही. अजून यापेक्षा अधिक मी गावच्या विकासासह तालुक्याच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी गोकुळ दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय होईन.

मढी देवस्थानबाबत मरकड म्हणाले, की मी देवस्थानचा कोणाला एकही रुपया खाऊ देत नाही किंवा देवस्थानच्या मालमत्तेचा दुरुपयोग करू देत नाही. त्यामुळे खरा वाद असून आताही दानपेटीमधील पैशांची या विश्वस्त मंडळाने अफरातफर केली आहे. दरम्यान, माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला असून, 307 चा गुन्हा दाखल करून मला पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.

गोकुळ दौंड म्हणाले, की भाजपच्या निष्ठावान अनेक कार्यकर्त्यांबाबत असे प्रकार होत आहेत. ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी वीस वर्षे घातली अशा लोकांवर अन्याय भाजपचे आमदार असताना होत आहे. लोकप्रतिनिधींच्या पायाखालची वाळू सरकल्याने असे अन्यायकारक प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत असल्याचा आरोप दौंड यांनी केला.

आमदारांनी मलाच फक्त शिक्षा दिली…
कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढीच्या विश्वस्त मंडळातील सर्वच पदाधिकार्‍यांचे राजीनामे आमदारांनी घेतले. फक्त मलाच पदापासून दूर केलं आणि बाकीच्या विश्वस्त मंडळाच्या पदाधिकार्‍यांना प्रमोशन देऊन मला दूर ठेवत शिक्षा दिली, असे संजय मरकड म्हणाले.

म्हणून विकास होत नाही…
राज्यात प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मढीच्या कानिफनाथांच्या देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी कायमस्वरूपी प्रशासक नेमावे त्यासाठी मी न्यायालयात जाणार असून गेल्या पंचवीस वर्षांपासून गावातील विश्वस्त असलेले मरकड हे कायमस्वरूपी वादात गुरफटलेले आहे. त्यामुळे विकास होत नाही, असे संजय मरकड म्हणाले.

SCROLL FOR NEXT