Latest

मराठी कलाकारांनी दिला कृष्ण जन्माष्टमीच्या आठवणींना उजाळा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भगवान श्रीकृष्‍णाच्‍या जन्‍मानिमित्त जन्‍माष्‍टमी सण जल्‍लोषात साजरा केला जातो. झी मराठीवरील कलाकारांनी देखील श्री कृष्ण जन्माष्टमीच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रोहित परशुराम (अर्जुन, अप्पी आमची कलेक्टर) म्हणतो, 'लहानपणी मी माझ्या गावात सगळ्यांसाठी कृष्णच होतो. मी अगदी लहानपणा पासून दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असायचो ते अगदी कॉलेजच्या दिवसांपर्यंत मी त्याचा भाग राहिलो आहे. आमच्या कॉलेजमध्ये दहीहंडी होत नव्हती, तेव्हा मी आमच्या शिक्षकांना विनंती करून कॉलेजमध्ये दही हंडीचा उत्सव सुरु केला आणि ती प्रथा अजूनही चालू आहे, आताही सगळी मुले कॉलेजमध्ये हा उत्सव उत्साहाने साजरा करतात. जसजशी जन्माष्टमी जवळ यायची तसे मी आणि माझे मित्र वर्गणी जमा करायचो आणि हंडी फोडून झाली की सगळे मिळूनच मस्त वडापाव बनवायचो. अशा माझ्या सुंदर आठवणी आहेत."

ह्रषीकेश शेलार (अधिपती, तुला शिकवीन चांगलाच धडा) ने सांगितले की, "माझ्या बाबांना श्री कृष्ण खूप आवडतो, म्हणून त्यांनी माझे नाव ह्रषीकेश ठेवले, या गोष्टीचे मला फार अप्रूप आहे. मला लहानपणी आई बाबा छान कृष्णा सारखा पोशाख घालायचे. अजून एक शाळेतील रम्य आठवण म्हणजे आम्ही सगळे विद्यार्थी डबा आणायचो, तेव्हा शाळेत सगळ्यांच्या डब्यातील पदार्थ एकत्र करून गोपाळकाला करायचो आणि मज्जेत, आनंदाने खायचो. त्या गोपाळकाल्याच्या किंवा प्रसादाची चव काही औरच असायची. आजही ती चव जीभेवर रेंगाळते."

आयुष संजीव (वेदांत वानखेडे, ३६ गुणी जोडी) याने आपल्या कृष्ण जन्माष्टमीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की," मी माटुंग्याला असताना कृष्ण जन्माष्टमीच्या तसेच दही हंडीचा थरार अनुभवला आहे. सगळे आमचे सवंगडी आम्ही एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने दही हंडी फोडायचो. एकदा तर मला प्रत्यक्ष शेवटच्या थरावर जाऊन दहीहंडी फोडायला मिळाली. तो फार अविस्मरणीय असा क्षण होता. मी आजही त्या क्षणाने इतका भारवलेलो आहे की माझी एक मनापासूनची इच्छा आहे बॉलीवूडमध्ये मला संधी मिळाली तर प्रथम दहीहंडी फोडण्याचा प्रसंग किंवा गाणे असावे. अजून एक छानशी आठवण म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा बदलापूरला राहायला गेलो तेव्हा तिकडे दहीहंडी फारशी कोणी साजरी करत नव्हते. आम्हा दोघा भावंडांचा फारच हिरमोड झाला त्या वेळी मात्र आमच्या आईने घरामध्येच एक सुंदरशी दहीहंडी तयार करून आमच्या भावंडांच्या आनंद द्विगुणित केला आणि आम्ही अगदी उत्साहाने ती दही हंडी फोडली. त्या वेळी माझ्या छोट्या भावाला कृष्णरूप दिले. आयुष्यात ही गोष्ट एक मखमली आठवण म्हणून कायम लक्षात राहील. श्री कृष्ण हा प्रेमसागर आहे, आपण जनमाणसानी हा एक गूण घेण्याची अत्यंत गरज आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT