Latest

मराठा आरक्षण : सिल्‍लोड शहरात व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद; रस्‍ते निर्मनुष्‍य

निलेश पोतदार

सिल्लोड ; पुढारी वृत्‍तसेवा सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर व सगे सोयऱ्यात आई व वडीलांकडची दोन्ही नाती गृहीत धरून काढलेल्या अधिसूचनेला कायद्यात रुपांतरीत करा, सर्वांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या तसेच आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याच्या शब्दाची अमलबजवणी करण्यात यावी या मागण्यांसाठी सिल्लोड शहासह तालुक्यात ग्रामीण भागातही व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. यामुळे शहरासह तालुक्यात ग्रामीण भागातही व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार, दुकाने, उद्योग कडकडीत बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाल्याने सकल मराठा समाजाने पुकारलेला बंद १०० टक्के यशस्वी झाला असून बंदच्या दरम्यान नेहमीचे वर्दळीचे रस्तेही निर्मनुष्य दिसून आले.

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. मात्र सरकारने याची चिंता न बाळगता पंधरा तारखेला विशेष अधिवेशन घेण्याचे जाहीर केले आहे. मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पुकारलेल्या बंदच्या हाकेला साथ देत सिल्लोड तालुका व शहर शंभर टक्के कडकडीत बंद करण्यात आले.

यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी सिल्लोड शहरासह प्रत्येक गावात मिरवणूक काढून व्यापारी बांधवांना शांततेत बंद करण्याचे आवाहन केले व सर्वधर्मीय व्यापाऱ्यांनी या बंदला समर्थन देत आपले दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली. लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षणाच्या सगेसोयऱ्याची काढलेली अधिसूचनेची रूपांतर तात्काळ कायद्यात करावे. जर जरांगे पाटील यांच्या प्रकृतीस काही हानी झाली तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा सकल मराठा समाज सिल्लोड तालुक्याचे वतीने देण्यात आला.

शहर व तालुका व्यापारी महासंघ तसेच ईतर सर्वच व्यापाऱ्यांनी दि.१४ बुधवार रोजी आपली दुकाने, उद्योग, छोटेमोठे व्यापार, लोटगाडी – ठेलेवाल्यांनी बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होत बंद १०० टक्के यशस्वी केला. सिल्लोड शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शहरासह ग्रामीण भागातील व्यापारी, उद्योजक, व्यवसायिक, छोटेमोठे उद्योग करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT