पुढारी ऑनलाईन डेस्क : "माझी फाेनवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबराेबर चर्चा झाली. मला जे अपेक्षित आहे ते मी त्यांच्याशी बोललो आहे. आम्हाला अर्धवट आरक्षण नकाे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम आहे, अशी माहिती आज (दि.३१) मनाेेज जरांगे-पाटील अंतरवाली सराटीतून आंदोलन स्थळावरुन माध्यमांशी बोलताना दिली. (Maratha Reservation Protest)
गेले काही दिवस राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतरही सरकारने मराठा आरक्षणावर कोणतीही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले. आजचा (दि. ३१) उपोषणाचा सातवा दिवस आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी २४ मिनिटे मनोज जरांगे पाटील यांनी आज फोनवरुन (दि.३१) संवाद साधला. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, "माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. मला जे अपेक्षित आहे ते मी त्यांच्याशी बोललो आहे. आम्हाला अर्धवट आरक्षण नकाे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम आहे. मराठा आरक्षण चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्याचबरोबर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. ६५ % मराठ्यांना आधीच ओबीसीतून आरक्षण आहे. आता उरलेल्यांना तातडीने आरक्षण द्या. अर्धवट आरक्षण दिल्यास त्याचे वाईट परिणाम होत राहतील. मराठवाड्यातील कागदपत्रे गोळा करा आणि आरक्षण द्या असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. मराठा बांधवाचा आग्रह मान्य करुन काल रात्रीपासुन मी जलप्राशन केले आहे. मराठा समाजाचा मान राखून पाणी प्यायलो. महाराष्ट्रातील मराठा समाज १०० टक्के शांत आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारचा जीआर मराठ्यांना मान्य असणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले, राजकीय नेत्यांना गावबंदी कायम आहे. आम्ही नेत्यांच्या दारात जाणार नाही आणि त्यांना पण येवू देणार नाही. माजी आमदार खासदार यांनी आरक्षणासाठी एकत्र यावं असेही ते म्हणाले.
मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ज्या मराठ्यांना कुणबी प्रणाणपत्र नको आहे त्यांनी घेवू नये. पण जे गोरगरीब मराठा आहे त्यांना याचा लाभ होणार आहे. मी लढणारा आहे. मराठा जात लढवय्या आहे. क्षत्रिय मराठ्यांनी लढायचं असतं जीवन संपवायचं नसतं. तसेच प्रत्येक मराठ्यांनी शांततेत आपली लढाई सुरु ठेवायची आहे. राज्यभर साखळी उपोषण सुरु ठेवावे असेही त्यांनी आवाहन केले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही लढाई कायम राहणार आहे.
हेही वाचा :