Latest

सरकारला तासभरही वेळ देणार नाही : मनोज जरांगे

Arun Patil

पाथर्डी/नगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची असून, ही शेवटची आरपारची लढाई आहे. सरकारने आम्हाला कितीही त्रास दिला, आमच्या छातीवर गोळ्या झाडल्या, तरी एक इंचही मागे हटणार नाही. हे आंदोलन सुरू झाल्यापासून सरकारला सात महिन्यांचा अवधी दिला. आता एक तासाचाही वेळ देणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी रविवारी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने सुरू झालेली पदयात्रा सकाळी पाथर्डीमार्गे अहमदनगर जिल्ह्यात आली. त्यावेळी झालेल्या सभेत जरांगेे बोलत होते.

सरकार मराठा आरक्षणासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करून जरांगे म्हणाले, आंदोलन सुरू झाल्यापासून आम्ही सात महिन्यांचा वेळ दिला. मात्र आरक्षणाचा तिढा काही सुटत नाही. आता सरकार मराठ्यांना आरक्षण कसे देत नाही ते मी आणि माझे मराठी बांधव मुंबईत आल्यावर बघू. आरक्षण द्या, बाकी आम्हाला काहीच सांगू नका. मराठे तुमच्या धमक्यांना घाबरणारे नाहीत. सरकारमध्ये तुमचे एकमत आहे की नाही याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही.

मराठा आरक्षणाचा लढा आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्यात 54 लाख मराठा ओबीसी आरक्षणात असल्याच्या नोंदी सापडल्या. अहमदनगर जिल्ह्यात सव्वादोन लाख कुणबी नोंदी आढळल्या. या नोंदी सापडून दीड महिना उलटला तरी प्रमाणपत्र दिले जात नाही. सरकारने कोणताही डाव टाकला तरी तो आता यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

गावागावांतून आल्या भाकरी

रविवारी रात्री बाराबाभळी येथे या मोर्चाचा मुक्काम होता. या ठिकाणी स्वागतासाठी मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांसाठी जिल्ह्यातून भाकरी, आमटी, भाजी, ठेचा, खिचडी असा मेनू मोर्चेकर्‍यांसाठी जमा झाला होता. सायंकाळी सातपासून जेवणाला सुरुवात झाली.

मी मॅनेज होत नसल्याने सरकारची अडचण

तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो असून, परत येईन की नाही माहीत नाही; मात्र मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालू ठेवा. प्रसंगी हातातील कामे सोडून रस्त्यावर उतरा. मी मॅनेज होत नसल्याने सरकारची अडचण झाली आहे. मुंबईत गेलेल्या लेकरांना किंचितही त्रास झाला तर मराठ्यांनी न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहा, असे आवाहन जरांगे यांनी उपस्थित समाजबांधवांना केले.

SCROLL FOR NEXT