Latest

Maratha reservation : न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती विदर्भात अमरावती आणि नागपूरला बैठक

सोनाली जाधव
नागपूर पुढारी वृत्तसेवा : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर इतरत्र विशेष कक्ष स्थापन केले आहेत. या कक्षाला अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश  निवृत्त न्यायमूर्ती तथा गठित समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती आज (दि. 22) नोव्हेंबरपासून दोन  दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये अमरावती येथील विभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुणबी नोंदी तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर दिनांक 23 नोव्हेंबरला पुन्हा नागपुरात प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत बैठक घेण्यात येणार आहे. (Maratha reservation)
आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे पथकासह दाखल झाले आहेत. या ठिकाणी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थित आहेत. अमरावतीत कुणबी-मराठा, मराठा कुणबी अशी नोंदच सापडली नाही तर अमरावती जिल्ह्यात कुणबी क्षत्रिय मराठा व मराठा अशा स्वतंत्र नोंदी सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
न्या. संदीप शिंदे व समितीचे इतर सदस्य दिनांक 23 नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते येथे विभागातील सहा जिल्ह्यात झालेल्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. विभागातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्ताऐवज आदी जूनी अभिलेखे समितीस सादर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षामध्ये 21 ते 24 नोव्हेंबर पर्यंत स्वत:हून उपलब्ध करुन देण्याचे आवाहन विभागीय आयुक्त् विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT