Latest

’मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊनच कोल्हापूरला या; अन्यथा उद्रेक पाहाल’

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 10 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय घेऊनच यावे; अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक ते कोल्हापुरात पाहतील, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीमाराचा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने निषेध नोंदविला. एका कार्यकर्त्याच्या घरी शनिवारी (दि. 2) तातडीची बैठक झाली. अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, शासनाने दीनदुबळ्या मराठ्यांवर लाठीचार्ज केला. हा लाठीचार्ज येथील महापुरुषांवर केला गेला आहे. शासनाला याची किंमत मोजावी लागेल.

शाहीर दिलीप सावंत म्हणाले, समाजातील नेतेच पक्षीय राजकारणामुळे गुलाम झालेत. त्यामुळे मराठ्यांना कोणी नेता आहे की नाही? हा प्रश्न आहे. किती दिवस भांडायचे, किती दिवस निषेध करायचा. उपोषण करणार्‍यांवर लाठीचार्ज केला जातो ही घटना गंभीर आहे. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे संस्थापक दिलीप देसाई म्हणाले, सकल मराठा समाजावरील भ्याड हल्ल्याविषयी चर्चा सुरू आहेत. पुढे नेमके नियोजन काय करायचे, आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील अन्य जिल्हा समन्वयकांशी चर्चा करून 10 सप्टेंबरपूर्वी व्यापक बैठक घेतली जाणार आहे.

यामध्ये आंदोलनाची दिशा, आरक्षण कसे मिळेल, यासाठी कोल्हापुरात कार्यशाळाही घेणार आहोत. कोल्हापुरातील 15 ऑगस्टच्या मराठा आरक्षण बैठकीत दंगा करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. नेत्यांना मतदान, खुर्ची पाहिजे आहे, त्यामुळेच ते ओबीसींना सांभाळत आहेत. मराठा समाजाला चिरडत असाल, तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही. मराठा खुर्चीवर बसलेल्यांना ताकद दाखवेल.

यावेळी अनिल घाटगे, पद्मावती पाटील, अमर निंबाळकर, नीलेश लाड, महादेव पाटील, बबन मोरे, अ‍ॅड. सतीश नलवडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT