नाते – मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाची व्याप्ती सर्व दूर पसरू लागली आहे. (Maratha Reservation) महाड तालुक्याच्या रायगड विभागातील एका टोकाला असलेल्या ऐतिहासिक मांडले या गावी काल झालेल्या एका विशेष बैठकीत गावातील सर्व मराठा समाजाच्या बंधू-भगिनींनी अबाल वृद्धांनी या मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन शासनाने त्वरित आरक्षणाबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. (Maratha Reservation)
सोमवारी सायंकाळी मांडले, ता. महाड, जि. रायगड येथील समस्त मराठा ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या साक्षीने मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना जाहीर समर्थन आणि पाठिंबा दर्शविला. यात सर्व मराठा बांधव, महिला वर्ग, आणि तरुण मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आणि तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्याची आग्रही मागणी केली. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर तांदलेकर यांनी उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनींना मार्गदर्शन करून मराठा आरक्षणाची असलेली आवश्यकता कथन केली.
याप्रसंगी परशुराम तांदलेकर सुरेश तांदलेकर भावेश मोरे यांनीही मराठा आरक्षणाची काळाची असलेली गरज ओळखून सरकारने विनाविलंब या संदर्भात निर्णय घ्यावा. सत्तर वर्षांपासून प्रलंबित असलेली ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली.
रोहे –
रोहा तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी तीन दिवस साखळी उपोषण मंगळवारी ( ३१ अक्टों ) सुरु केला आहे. जालना येथील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. याचबरोबर या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत. या अनुषंगाने उपोषणाला पाठींबा म्हणून रोह्यात रोहा तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने रोहा कोलाड मार्गावरील नगरपरीषद चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव बसले आहेत. सकाळी दहा वाजता या उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणाला महिलांची उपस्थिती होती.
यावेळी सकल मराठा समाज अध्यक्ष अप्पा देशमुख, नारायण धनवी, विजयराव मोरे, माजी नगराध्यक्ष रत्नप्रभा काफरे, समिर शेडगे, विनोद पाशिलकर, अमित उकडे, नितीन परब, प्राजक्ता चव्हाण, समिक्षा बामणे, स्वरांजली शिर्के, महेश सरदार, दशरथ साळवी, दिपक देशमुख, प्रशांत देशमुख, सुर्यकांत मोरे, चंद्रकांत पार्टे, अजय लोटणकर, लिलाधर देशमुख, अमोल देशमुख, संकेत देशमुख, निलेश शिर्के, संदिप सावंत, आदित्य कोंढाळकर, राजेश काफरे, मयुर पायगुडे, अजित मोरे आदी उपस्थित होते.
या उपोषणाच्या सुरुवातीला मराठा समाज नेते व्ही. टी. देशमुख यांनी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा म्हणून रोहा तालुक्यातील तमाम मराठा समाजाच्यावतीने पाठींबा देण्यासाठी आज आम्ही साखळी उपोषण करीत आहोत. आमचा लढा आरक्षण मिळेपर्यंत असणार असल्याचे सांगितले. यावेळी मराठा समाज नेते समीर शेडगेसह अन्य नेत्यांनी मनोगत व्यक्त केले आहे.
यावेळी मराठा समाजाच्या उपोषणास मुस्लिम समाजाने पाठींबा दिला आहे. तर समाजातील विविध पक्षातील नेत्यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. या उपोषण ठिकाणी राजेश काफरे तीन दिवस अन्न त्याग करणार आहेत.
मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व साखळी उपोषण याबाबत रोहा प्रशासनास रोहा तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी निवेदन देण्यात आले होते. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली होती.
महाड – गेल्या काही दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा देऊन सकल मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळावे, याकरिता ऐतिहासिक महाड नगरीमध्ये सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून कँडल मार्चचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यातील मराठा समाजाची असलेली स्थिती लक्षात घेऊन मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. चालू महिन्यात मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून व्यापक पाठिंबा मिळत असून या निमित्ताने महाडमधील सकल मराठा समाजाच्या वतीने आजच्या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व सकल मराठा समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.