शिराळा- पुढारी वृत्तसेवा-जालना येथे मराठा समाजावर केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील सर्व गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. शिराळा शहरात बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. शिराळा आगारातील सर्व बस गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या तर सर्व मार्गावरील फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या.
बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. सर्व पक्ष बंदमध्ये सहभागी झाले होते. गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शाळा व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवहार बंद होते. सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी आंबामाता मंदिरात बैठक घेऊन बंद मध्ये सहभागी होण्याचे ठरले बंद शांततेत पार पाडावा असे अवाहन करण्यात आले होते.
मुस्लिम बांधव यांनी बंदला पाठींबा दिला होता. चरण व आरळा आठवडा बाजार असल्याने या गावातील व्यवहार सुरू होते, येथे उद्या बंद पाळण्यात येणार आहे.