पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत आमचा कोणालाही पाठिंबा नाही. आम्ही कोणतेही उमेदवार उभे केलेले नाहीत. काहीजण मराठा समाजाच्या नावाखाली उभे राहात आहेत. अशा लोकांमुळे समाजाला गालबोट लागेल. त्यातून जर त्या उमेदवाराला कमी मते पडली, तर समाजाची बदनामी होईल. समाज हरला, असा संदेश त्यातून जाईल. त्यापेक्षा उमेदवारांना पाडणारे बना. तोच आपला मोठा विजय असेल, असे विधान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी (दि. 7) केले.
जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी जे सगे-सोयर्यांबाबत निर्णय घेतील, त्यांच्या बाजूने उभे राहा. मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष आहे. तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल.
सहा जूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभा काबीज करणार असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचा संपर्क नाही. आमची मने एक आहेत.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिसूचना काढली होती. त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे होते. मात्र अंमलबजावणीबाबत धोका झाला. त्याला उशीर झाला आहे, असेही जरांगे म्हणाले.
सध्या राजकीय वक्तव्य करणार नाही. लोकसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात येऊद्या, त्यावेळी समाजाला काय संदेश द्यायचा तो देईन, असे जरांगे यांनी पुण्यात सांगितले.