Latest

Manoj Jarange Patil In Nashik : काहींचे हिशोब चुकते करायचे आहेत : जरांगे पाटील

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ; फक्त मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी लढतो आहे. मला जनता पाहिजे, सत्तेची हाव नाही. मराठा समाजाचे आरक्षण अंतिम टप्प्यात असून काहींचे हिशोब चुकते करायचे असल्याचा टोला मराठा आरक्षण आंदोलनाचे अग्रणी तथा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. ते नाशिक येथे बोलत होते.  (Manoj Jarange Patil In Nashik)

मनोज जरांगे पाटील हे आज (दि. 22) नाशिक दौऱ्यावर आहेत. सिडकोतील त्रिमुर्ती चौकात हजारोंच्या संख्येत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, उपोषणामुळे मला शरीर साथ देत नाही. तुमचे माझ्यावर प्रेम आहेच शिवाय काहींचे हिशोब चुकते करायचे आहे, ते सभेत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी संपूर्ण राज्यभरात सभा घेणं सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे हे नाशिक मध्ये सभा घेत आहेत. मराठा आंदोलनाचे ब्रँड बनलेले तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

मराठा आरक्षणाचा चेहरा बनलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी नविन नाशिक सिडको सकल मराठा समाज यांच्या कडून त्रिमूर्ती चौक या ठिकाणी सर्व पक्षीय तसेच राजकीय सामाजिक संघटना यांच्या कडून जोरदार तयारी करण्यात आली होती. फुलांची पुष्पवृष्टी जरांगे पाटील यांच्यावर यावेळी करण्यात आली. यावेळी त्यांनी समाजाला बोलताना सांगितले क,  मुंबई येण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी ठणकावलं आहे. आम्ही संपूर्ण आंदोलन शांततेत पूर्ण केलं होतं, परंतु आमच्यावर सरकारच्या आदेशावरुन हल्ला करण्यात आला. सरकार आंदोलन दडपण्यासाठी कारस्थानं करत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

यावेळी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ज्येष्ठ नेते नाना महाले, शिवेसेनेचे सुधाकर बडगुजर, अजय बागुल, विजय करंजकर, राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे, जगन पाटील, सुभाष गायधनी, विष्णू पवार, आण्णा पाटील, मामा ठाकरे, संतोष सोनपसारे, सुनील जगताप, मकरंद सोमवंशी, अविनाश पाटिल, विश्राम सोनवणे, डी. जी. सूर्यवंशी, मुरलीधर भामरे, दत्ता पाटील, नाना भामरे, सुभाष देवरे, दादा कापडणीस, धोंडीराम बोडके यांच्यासह मराठा समाजाचे बाळासाहेब गीते, आशिष हिरे, संजय भामरे, पवन मटाले, राम पाटील, अक्षय पाटील, उमेश चव्हाण, सागर पाटील, जय पवार, सागर जाधव, शैलेश साळुंखे, विजय पाटील, महेंद्र पाटिल, योगेश पाटील, शुभम महाले, तसेच यावेळी महिला भगिनी राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष योगिता हिरे, शितल भामरे, वंदना पाटील, साधना मटाले, सुमन महाले, सह मराठा समाजाचे पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सिडको  नविन नाशिक सकल मराठा समाजाचे योगेश गांगुर्डे यांनी प्रास्ताविक व तसेच आलेल्या सर्व समाज बांधवांचे आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT