पुढारी ऑनलाईन: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. घोटाळ्याचा तपास महत्वपूर्ण टप्प्यावर आलेला असल्याने सिसोदियांच्या कोठडीत वाढ केली जावी, अशी विनंती सीबीआयकडून करण्यात आली. यावर विशेष न्यायालयाने कोठडी वाढविण्याचा निर्णय दिला.
मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी २०२३ राेजी अटक करण्यात आली होती. मद्य धोरण घोटाळ्याचा कट रचणे, त्याद्वारे आर्थिक लाभ घेणे आणि पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. याआधी ३१ मार्च रोजी विशेष न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यांना मद्य धोरण घोटाळयाचा लाभ झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची टिप्पणीही न्यायालयाने त्यावेळी केली होती.
मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी आज (दि.३) संपली. त्यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. यामध्ये सीबीआयने दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणातील तपास निर्णायक टप्प्यावर आला असल्याचे स्पष्ट केले. पुढे सिसोदिया यांची कोठडी वाढण्यासंदर्भात न्यायालयाकडे मागणी केली होती. यावरील सुनावणी नंतर न्यायालयाने मनिष सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ केली आहे.
हेही वाचा :