Latest

मंडलिक-शाहू महाराज, धैर्यशील माने-शेट्टी लढत

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू महाराज विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक, तर हातकणंगलेत महायुतीने धैर्यशील माने यांना उमेदवारी दिल्याने माने विरुद्ध स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशा लढती निश्चित झाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर केली.

हातकणंगलेतून राहुल आवाडे, रयत संघटनेचे सदाभाऊ खोत, तर कोल्हापूरमधून चेतन नरके यांनी उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. मराठा संघटनेचा उमेदवारही हातकणंगलेतून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनेने आपला उमेदवार आखाड्यात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार रिंगणात असेल, त्यामुळे हातकणंगलेत बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापुरातून शाहू महाराज हे काँग्रेसचे उमेदवार असून, त्यांचा सामना शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याशी होईल. येथे शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असून, त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. येथे मराठा संघटना उमेदवार देणार नसल्याचे समजते.

दरम्यान, 'गोकुळ'चे संचालक चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले. काही पक्ष आपल्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला.

हातकणंगलेतून विद्यमान खासदार शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने यांना अखेर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता उमेदवारी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. माने यांना शिंदे यांनी अचानकपणे मुंबईला बोलावल्यामुळे तर्क लढविले जात होते. अखेर मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. माने यांनी दै. 'पुढारी'ला ही माहिती दिली.

तेथे स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतरावर राहत 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे. शेट्टी आघाडीत आले तर त्यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आहे, तर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेट्टी यांना आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेतली आहे.

भाजपचे सहयोगी तसेच ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी महायुतीतून बंडाचे निशाण फडकावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तर माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपलाही हातकणंगलेतून विचार व्हावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचीही चांगली ताकद आहे. त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा की, आपला उमेदवार उभा करायचा, याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हातकणंगलेतून बहुरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट आहेत.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे यांचा आपल्याला पाठिंबा मिळेल, तसेच प्रकाश आंबेडकर यांचाही आपल्यालाच पाठिंबा मिळेल, असे म्हटले आहे. मनोज जरांगे यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांच्या आड येत नाहीत, असे सांगून शेट्टी यांनी वंचित बहुजन आघाडीचा आपल्यालाच पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT