मंचर, पुढारी वृत्तसेवा: विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेला व पोलिसांना चकवा देणारा आरटीआय कार्यकर्ता उमेश नामदेव इचके (रा. नागापूर, ता. आंबेगाव) याला मंचर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीस घोडेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला शनिवार (दि. 24) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
"माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून इचके याने मंचर व पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागापूर, रांजणी, वळती या भागांतील सामान्य नागरिकांना धाक दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. काही जणांकडून तर त्याने खंडणीही घेतली होती. याबाबत मंचर पोलिस ठाण्यात त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच, नारायणगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. त्यानंतर तो फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. बुधवारी (दि. 21) पोलिसांनी शिताफीने इचकेला अटक केली.
माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून उमेश नामदेव इचके याने आतापर्यंत अनेक नागरिकांना लुबाडले असून, अजूनही कुणाला धमकी देऊन आर्थिक फसवणूक केल्यास न घाबरता मंचर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी केले आहे.