पुणे, पुढारी वृत्तसेवा: तोंडावर अॅसीड टाकून चेहरा विद्रुप आणि मुलाचे अपहरण करण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार करणार्या तसेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास दबाव टाकणार्या एकाला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याची साथीदार असलेल्या महिलेवरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिद मोहंमद अली कुंजु (39, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याची साथीदार हसिना हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी साजिद कुंजु हा पिडीत महिलेला फोन करून तु खुप आवडतेस, तु मला खुश कर, माझ्या सोबत मैत्री कर, तु जर नकार दिला तर मी तुला जिवंत सोडणार नाही. तुझे अश्लिल फोटो व व्हिडीओ तयार करून व्हॉट्सअप, फेसबुक माध्यमांवर अपलोड करेल. तुझी इज्जत भर रस्त्यावर आणेल. तोडावर अॅसीड फेकून चेहरा विद्रुप करून टाकील तसेच तुझ्या मुलाचे अपहरण करेल, अशी धमकी देत बलात्कार करणार्या साजिदला अटक करण्यात आली आहे. तर हसिना हिने पिडीत महिलेला खंडणीची मागणी करत भाऊ असलेल्या साजिद बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी धमकावल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस करत आहे.