Latest

पुणे: माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणार्‍याला बेड्या, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: माथाडी संघटनेच्या नावाखाली दोन लाख 90 हजारांची खंडणी उकळणार्‍या एकास खंडणी विरोधी पथक 2 ने अटक केली. खडकी रेल्वे स्थानकातील मालधक्का परिसरात ही कारवाई करण्यात आली. पप्पू भिवा खरात (वय 36, रा. ओैंध) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत चाकण येथील एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकाने फिर्याद दिली. तक्रारदार एका लॉजिस्टिक कंपनीत अधिकारी आहेत. संबंधित कंपनीकडून रेल्वेने आलेल्या मालाची वाहतूक केली जाते. खडकीतील मालधक्का परिसरातील रेल्वेने आलेल्या मालाची पोहोच संंबंधित कंपनीकडून केली जाते.

आरोपी खरात याने माथाडी संघटनेच्या नावाखाली कंपनीतील अधिकार्‍याला धमकावले. मालाची वाहतूक आमच्या संघटनेकडून करण्यात येईल, असे सांगून खरात याने त्यांच्याकडून एक लाख 90 हजार रुपये खंडणी उकळली. त्यानंतर खरातने पुन्हा कामात अडथळा आणून एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांना देण्यात आली. खरातला एक लाख रुपये त्यांनी दिली. पैसे दिल्यानंतर खरातकडून धमकी दिल जात होती. अधिकार्‍याने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली.

यानंतर खरातला सापळा लावून खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने अटक केली आहे. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, अमंलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, सचिन अहिवळे, अमोल पिलाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

खरात याने काम सुरू ठेवण्यासाठी पैशाची मागणी करून वेळोवेळी 2 लाख 90 हजार रूपये स्विकारून प्रति रॅकला 50 हजारांची मागणी केल्याने ही तक्रार दाखल झाली होती. खरात हा हमाल पंचायतचा सदस्य असून भरणा वेळेत नसल्याने 2015 पासून त्याचे माथाडी बोर्डाने रजिस्टेशन रद्द केले होते. माथाडीच्या नावाखाली कोणी खंडणी मागत असेल तर गुन्हे शाखेची संपर्क साधावा
– बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक 2

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT