वॉशिंग्टन : पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात चाललेल्या गडबडींमुळे जगातील प्रमुख गुंतवणूकदार हे आशिया खंडात पैसा गुंतवण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. चीन व आशियातील इतर उदयोन्मुख देश हे अमेरिकेतील आर्थिक वादळाचा सामना करण्याच्या दृष्टीने चांगल्या स्थितीत आहेत, असे या गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.
जागतिक आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करीत सिटीबँकेने असे नमूद केले आहे की, आशियाई वित्तीय बाजार हे अमेरिकेच्या तुलनेत अधिक समर्थ आहेत आणि बहुतांशी आशियाई चलने ही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत मजबूत झाली आहेत. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक ज्या दिवशी कोसळली, त्या दिवसापासून अमेरिकी बँकिंग निर्देशांकात जवळपास १० टक्के घसरण झाली, मात्र याच कालावधीत जपान वगळता आशियातील अनेक देशांमध्ये आर्थिक निर्देशांक उंचावले, यावरून हे दिसून येते.
आम्हाला वाटते की, आशियातील बँकांना तुलनेने चांगले कवच लाभलेले आहे. अमेरिकेतील मंदी सदृश्य वातावरणात डॉलरचे मूल्य कमी होऊ शकते आणि त्यामुळे आशियामध्ये रोखीचा प्रवाह वाढू शकतो, असे मत सिटीग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका जोहाना चुआ यांनी व्यक्त केले.
काही अर्थशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आशिया-पॅसिपिक प्रदेशातील देशांमध्ये चलनविषयक धोरण संतुलित आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि भारत येथील मध्यवर्ती बँकांनी कोणत्याही परिस्थितीत व्याजदर वाढवायचेच, असे काही कडक धोरण ठेवलेले नाही. चीनचेही आर्थिक धोरण गुंतवणूकदारांसाठी सुलभ आहे. कोविडपश्चात काळात तेथे पुन्हा व्यवहार सुरळीत झाले आहेत. गुंतवणूकदारांना चीनचे सर्वोच्च आकर्षण आहे.
आर्थिक स्थैर्यविषयक जोखीम आणि थंड मागणी अशी चिन्हे दिसत असताना फेड रिझर्व्हने व्याज दरवाढीच्या चक्राचा अंत केल्यास, बाह्य वित्तावरील डॉलरचा दबाव कमी होईल आणि सुरक्षित आश्रयस्थान म्हणून डॉलरचे स्थान डळमळीत होऊन आशियातील अर्थव्यवस्थांना मदत होईल, असे काही अर्थतज्ज्ञांना वाटते.
चीनच्या नेतृत्वाखालील आशियातील विकसनशील देश या वर्षी व पुढील वर्षीही वेगाने वाढतील आणि कमी चलनवाढ साध्य करतील. या पार्श्वभूमीवर अमेरिका, युरोपीय देश आदी प्रगत अर्थव्यवस्था मंद गतीने वाढतील, असे मत एशियन डेव्हलपमेंट बँकेने या आठवड्यात एका अहवालात मांडले आहे.
चीनमधील औद्योगिक प्रगतीची आकडेवारी काहीशी निराशाजनक आहे. त्यामुळे या देशात गुंतवणूक करणाऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेशी चीनच्या बिघडलेल्या संबंधांचा विपरीत परिणाम हाँगकाँग आणि तैवानसारख्या ठिकाणी गुंतवणूक करण्यावर होईल, अशी भीती आहे.