Latest

टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार तुकाराम सुपेला जामीन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार, आरोपी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम नामदेव सुपे (वय 58 रा. पुणे) यांला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या न्यायालयाने विविध अटी-शर्ती आणि ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. सुपे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

अडीच कोटीचे रोख रक्कम व साहित्य केले होते जप्त

टीईटी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम सुपे याला 17 डिसेंबर 2021 रोजी पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. सायबर सेलने सुपे याला प्रथम चौकशीसाठी बोलावले होते. नंतर त्याला अटक करण्यात आली होती. शिक्षक पात्रता परीक्षेत परिक्षार्थींकडून पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा आरोप तुकाराम सुपे यांच्यावर आहे. सुपे याला अटक केल्यानंतर तपासादरम्यान दिलेल्या पोलिस कोठडीतील जबाबावरून सुपे याच्या रहात्या घरातून तुकाराम सुपेचा जावई, मुलगा, नातेवाईक व मित्र मंडळी यांच्याकडून सुपे याने 7 सुटकेसमध्ये भरून ठेवलेले दोन कोटी 34 लाख रुपये व 65 लाखांचे सोन्याचे दागिने, पतसंस्था मधील मुदत ठेवीच्या पावत्या, पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या मिळकतींचे कागदपत्रे जप्त केले होते.

बळीचा बकरा केले जात असल्याचा युक्तीवाद

याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी सुपे यांने अ‍ॅड. मिलींद पवार यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. पवार म्हणाले, ज्या वेळी टिईटीच्या परिक्षा झाल्या व निकाल जाहीर झाला त्या वेळी फिर्यादी असलेले दत्तात्रय गोविंद जगताप हे स्वतः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त पदी होते. त्यामुळे सुपेंच्या कार्यकाळात हा गुन्हाच घडलेला नाही. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रावर डिजिटल सही असते. त्यामुळे सुपे यांच्या अपरोक्ष संबंधित प्रमाण पत्रांचे वितरण झाले आहे. सुपे हे काही संगणक तज्ज्ञ नाहीत त्यामुळे सुपे स्वतः संगणकावर कुठल्याही प्रकारची हेराफेरी करू शकत नाहीत.

सुपे जरी आयुक्त पदावर होते तरी ते अतिरिक्त व तात्पुरत्या स्वरूपात आयुक्त पदावर होते. सुपे एकटे कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत. सुपे हे त्या दरम्यान एसएससी व एचएससी बोर्डाचा अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत होते. त्यामुळे या प्रकरणी सुपे यांना बळीचा बकरा केलं आहे. खरे आरोपी आजही बाहेरच आहेत. सुपे यांच्याकडून तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेचा व आयुक्त तुकाराम सुपे यांचा काही एक संबंध नाही. खटला जेव्हा सुरू होईल त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेचा व दागिन्यांचा खुलासा न्यायालयात आम्ही करू, त्यामुळे आता आयुक्त तुकाराम सुपे यांना कारागृहात ठेऊन काही निष्पन्न होणार नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. पवार यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT