Latest

बारामतीत महायुतीचा उमेदवार उभा राहणार, विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

अमृता चौगुले

नारायणगांव : पुढारी वृत्तसेवा :  बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभा राहणार आणि तो विजयी होणार असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला,ते म्हणाले की, बारामती मतदारसंघात आम्हाला विजयाची बिलकुल चिंता नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे 'घर चलो' अभियान राबविताना चांगला प्रतिसाद मिळत असून, या मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

खा. सुप्रिया सुळे यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे मनातून वाटते की, अंतर्मनातून वाटते हे त्यांचे त्यांना माहीत. त्या भावा-बहिणीचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याने अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी पहिला हार घालीन, या सुप्रिया सुळे यांच्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले, ते म्हणाले, महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून कोणतेही मतभेद अगर स्पर्धा नाही. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, हे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणे काही गैर नाही. आम्हाला वाटते, देवेंद फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. शिवसेनेला वाटते, एकनाथ शिंदे हेच कायम मुख्यमंत्री राहावेत. कार्यकर्ते अशी चर्चा करीत असतात. आमच्यात कोणत्याच पदावरून गटबाजी नाही. पुढे काय होईल ते पाहू. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार यांनी खूप प्रयत्न केले हे सगळ्यांना माहीत आहे. भाजपच्या व देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार यांनी केले, हे अजित पवार यांनी या अगोदर सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले आहे, त्यांना कोणी रोखू शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांनी भेटण्यात काही गैर नाही. त्यांना कोणीही भेटू शकते.

गेल्या नऊ वर्षांत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामावर जनता खूश आहे. आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधून नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. 'ड्रग'चे साठे पकडले जातात, याबाबत सरकारचे सगळ्यांनी अभिनंदन करायला हवे. एका दिवसात महाराष्ट्रात 'ड्रग' आलेले नाही. महाराष्ट्रात अवैध व्यवसायला थारा नाही. देवेंद्र फडणवीस यांचे गृहमंत्री म्हणून चांगले काम सुरू आहे. कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती हा निर्णय काही या सरकारचा नाही. या अगोदरच्या निर्णयाची अंमलबजावणी होतेय, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT