Latest

बाजार समित्यांवर ‘मविआ’चा झेंडा

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी डेस्क : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. त्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकाही महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. शुक्रवारी 147 बाजार समित्यांसाठी चुरशीने झालेल्या मतदानामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाविकास आघाडीला 81 समित्यांवर तर भाजप-शिवसेना महायुतीला 48 समित्यांवर विजय मिळाला आहे. यामध्ये 40 समित्यांवर झेंडा फडकावत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला 38, काँग्रेसला 31, ठाकरे गट 11, शिवसेना (शिंदे गट) 8 तर इतरांना 18 समित्यांवर यश मिळाले आहे. 235 पैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक आधीच बिनविरोध झाली आहे. उर्वरित समित्यांचे शनिवारी निकाल जाहीर झाले. 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली होती.

बारामती राष्ट्रवादीकडेच; बीडमध्ये पंकजा मुंडे यांना धक्का

बारामतीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा करिश्मा पाहायला मिळाला. बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात काट्याची टक्कर झाली. यामध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का देत वर्चस्व सिद्ध केले.

मराठवाड्यात 'मविआ'ची बाजी

मराठवाड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा मिळवून वर्चस्व स्थापन केले. विशेष म्हणजे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील परळीसह पाच बाजार समित्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने यश मिळविले.

बीड जिल्ह्यातील बीडसह गेवराई, परळी, अंबाजोगाई, वडवणी बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या असून केज बाजार समितीवर भाजपने वर्चस्व स्थापन केले. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, भूम भाजप तर परंडा, वाशी, कळंब, मुरूम आाणि उमरगा बाजार समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले. लातूर जिल्ह्यात लातूर, औसा काँग्रेस तर उदगीर बाजार समितीवर महाविकास आघाडीने बाजी मारली. चाकूर बाजार समितीवर भाजपने वर्चस्व स्थापन केलेे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, सेलू, पूर्णा येथे महाविकास आघाडी तर बोरी, जिंतूर बाजार समितीवर भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. ताडकळस बाजार समिती भाजप आणि महाविकास आघाडीच्या ताब्यात आली आहे. हिंगोली बाजार समितीवर भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने वर्चस्व स्थापन केले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि भोकर बाजार समितीवर काँग्रेसने बाजी मारली. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीवर भाजप आणि शिंदे गटाने तर कन्नड शिवसेना व वैजापूर बाजार समितीवर भाजप-शिवसेनेने वर्चस्व स्थापन केले. जालना जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर, आष्टी आणि अंबड बाजार समिती निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर केले जाणार आहेत.

बारामतीत पुन्हा राष्ट्रवादीच

पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत बारामतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, मंचरमध्ये माजी गृहमंत्री तसेच आमदार दिलीप वळसे-पाटील, पुरंदरमध्ये आमदार संजय जगताप, तर इंदापूरमध्ये माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या पॅनेलची सरशी झाली आहे. दौंडमध्ये मात्र आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यामध्ये बरोबरी झाली. हवेलीत भाजपप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलने 13 जागा जिंकत राष्ट्रवादीच्या पॅनेलला धक्का दिला. आंबेगावमध्ये वळसे-पाटील यांच्या विरोधात बंडखोरी केलेले देवदत्त निकम विजयी झाले.

बारामतीत नेहमीप्रमाणे सब कुछ राष्ट्रवादीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून या वेळी प्रथमच भाजपने निर्माण केलेले आव्हान सर्व जागा जिंकत मोडीत काढण्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यशस्वी ठरले. आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजार समितीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी 17 जागा जिंकल्या आहेत. हवेली तालुक्यातील पुणे बाजार समितीत भाजप आणि राष्ट्रवादी अशी समोरासमोर लढत होती, त्यामध्ये 13 जागा जिंकत भाजपने वर्चस्व मिळविले आहे.

दौंडमध्ये काट्याची टक्कर

दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांची बाजार समितीवर 25 वर्षे सत्ता होती. त्या सत्तेला भगदाड पाडण्यात भाजपचे आमदार राहुल कुल यशस्वी झाले असले तरी थोरात यांनीही बरोबरी साधत आपले वर्चस्व कमी होऊ दिले नाही. पुरंदर बाजार समितीवरील आपले वर्चस्व राखण्यात पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप पुन्हा यशस्वी झाले. इंदापूरमध्ये बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवत चांगली मोट बांधली होती. त्यांनी माजी राज्यमंत्री राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या साथीने मोठा विजय मिळविला.

नाशिकमध्ये 'मविआची'च सरशी

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा बाजार समिती वगळता 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत 12 ही ठिकाणी मविआने सत्ता मिळवत जिल्ह्याच्या राजकारणातील आपला प्रभाव दाखवून दिला.

दादा भुसे यांना धक्का

जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांपैकी नांदगाव वगळता 11 बाजार समित्यांचा निकाल हाती आला असून जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीला कौल देत भाजप आणि शिंदे गटाला नाकारले आहे. मालेगाव बाजार समितीतील प्रतिष्ठेच्या लढतीत पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुरस्कृत पॅनेलचा शिवसेनेचे अद्वय हिरे गटाने पराभव करत धक्का दिला; तर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना येवल्यात निर्विवाद यश मिळाले असले तरी लासलगाव बाजार समितीत त्यांच्या गटाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी धूळ चारली. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्यात कांटे की टक्कर झाली. दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. 9-9 अशा समान जागा मिळाल्या.

नागपूर जिल्ह्यात तीनही समित्यांवर काँग्रेसचा विजय

नागपूर ः नागपूर जिल्ह्यातील तीन बाजार समितीसाठीच्या निकालात तीनही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. रामटेकमध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांची युती मतदारांनी झुगारली. या ठिकाणी केदार यांचेच कार्यकर्ते असलेल्या काँग्रेसचे सचिन किरपान, बिनू गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलच्या 18 पैकी 14 जागा निवडून आल्या. 4 जागा भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी आणि काँग्रेसच्याच गज्जू यादव यांच्या आघाडीला मिळाल्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांना धक्का

पूर्व विदर्भाचा विचार करता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात या निवडणुकीच्या निमित्ताने बरेच राजकारण झाले. भंडारा येथे 18 पैकी 9 जागा काँग्रेसला तर 9 जागा युतीला मिळाल्या. लाखनीमध्ये काँग्रेसला चार तर युतीला 14 जागा मिळाल्या. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी हा निकाल धक्का देणारा आहे. लाखनी हे नाना पटोले यांच्या विधानसभा क्षेत्रात येते.

SCROLL FOR NEXT