Latest

वज्रमूठ सैल!

Arun Patil

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आकाराला आलेली महाविकास आघाडी सत्ता गेल्यानंतरही कायम असली, तरी आघाडीची वज्रमूठ विस्कटत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. 'तूच माझा आधार, पण वेगळा माझा भ्रतार' अशी आघाडीतील पक्षांची आणि नेत्यांची अवस्था झाली आहे! भाजपशी मुकाबला करण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे आघाडीतल्या नेत्यांचाच तोंडभरून समाचार घ्यायचा, अशा आघाडीतील विसंवादी वातावरणाने अलीकडे चांगलीच उचल घेतली आहे. आघाडी एकत्र आणण्याचे आणि ती एकत्र बांधून ठेवण्याचे काम सत्तेच्या फेव्हिकॉलने केले. त्यामुळे तिचे सूत्रधार कोण किंवा त्यासाठी पुढाकार कोणी घेतला, या गोष्टी दुय्यम ठरल्या. त्याहून महत्त्वाचे म्हणजे सत्ता असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या बहुसंख्य आमदारांना एकत्र ठेवण्यात यश आले नाही आणि त्यामुळे सत्ता गेली. सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी विस्कटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, एकत्र राहिलो तरच भाजपचा मुकाबला करू शकतो, याची जाणीव आघाडीच्या प्रमुख नेत्यांना झाल्याने वरवरपणे का असेना एकजूट दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु, कुठलीही आघाडी बळजबरीने होत नसते, त्यासाठी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचीही मने जुळावी लागतात. आघाडीमध्ये सुरुवातीपासून ती कधीच जुळली नव्हती.

काँग्रेसमध्ये शरद पवारांचा द्वेष करणार्‍यांचा मोठा भरणा आहे. राष्ट्रवादीच्या जीवावर काँग्रेसला यश मिळाल्यामुळे काँग्रेसबाबत तुच्छतेची भावना राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेनेला एकीकडे शरद पवार यांच्याशी कारणापुरती जवळीक वाटत असली, तरी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी त्यांची नाळ जुळलेली नाही. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षाशी नाईलाजाने आघाडी करू लागल्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये असलेली अस्वस्थता पुन्हा वेगळी आहे. अशा रीतीने आघाडी मुळातच अंतर्विरोधांनी भरलेली आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याचा अहंकार वेगळ्या उंचीवरचा आहे आणि आपल्यामुळेच आघाडी टिकून आहे, असा प्रत्येकाचा समज. खरे तर आघाडीच्या राजकारणात नेत्यांनी, सगळे एकत्र राहून आघाडी पुढे नेण्यासाठी सामोपचाराची भूमिका घेण्याची गरज असते, त्याचा अभाव आहे.

एका राजकीय पक्षातही मतभेद असतात, तिथे तीन पक्षांच्या आघाडीत काही मुद्द्यांबाबत मतभेद असणे स्वाभाविक असले, तरी ते टोकाला गेल्याने नवे प्रश्न निर्माण होत आहेत. सरकार चालवताना त्यासाठी किमान समान कार्यक्रम होता. सत्तेत नसतानाही अशा कार्यक्रमाच्या आधारे वाटचाल कठीण नसते. परंतु, ती सामोपचाराने करण्याऐवजी एकमेकांच्या दुखर्‍या नसांवर बोट ठेवण्याचे प्रयत्न तिन्ही पक्षांचे नेते करताना दिसतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपवर कमी आणि राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नेत्यांविरोधात अधिक बोलतात. पटोलेंना शह देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत अधिक गोंधळ माजवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच आघाडीच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळातून जाहीरपणे शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा छुपा संघर्ष आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या शक्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि महाविकास आघाडीमध्येही अनेक दिवसांपासून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या आणि पक्षातील एक गट भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पक्षावर अजित पवार यांचे नियंत्रण आहे की, शरद पवार यांचे, असाही प्रश्न त्यातून निर्माण झाला. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवून पक्षावर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवण्यासाठी पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची गुगली टाकली आणि आपल्या आजवरच्या कार्यशैलीप्रमाणे तो निर्णय मागेही घेतला. खुंटा हलवून बळकट करण्याचा प्रयत्न केला. 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीमध्ये महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात त्यांनी काही महत्त्वाची विधाने केली आहेत.

शिवसेना आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटातही मोठी अस्वस्थता आहे. त्याआधी अदानी उद्योगसमूहासंदर्भात वक्तव्य करून पवार यांनी काँग्रेसची तीव्र नाराजी ओढवून घेतली. पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीसंदर्भात टिप्पणी केल्यानंतर त्याच्या उत्तरादाखल शिवसेनेच्या मुखपत्रातून पवार यांच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील संबंध पूर्वीसारखे मधुर राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याची तुलना राऊत यांनी मल्लिकार्जुन खर्गे-राहुल गांधी यांच्या भूमिकांच्या संदर्भाने केल्यानंतर नाना पटोले यांनी राऊत यांना जाहीरपणे फटकारले. राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात राऊत यांनी तोंड उघडल्यावर अजित पवार यांनीही राऊत यांच्यावर टीका केली. यालाच समांतरपणे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पारंपरिक वादाला कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने फोडणी मिळाली.

कर्नाटकातील प्रचारात चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपशी असलेल्या जवळिकीसंदर्भात विधान केले. त्याला शरद पवार यांनी सातार्‍यातूनच उत्तर देऊन चव्हाण यांच्या वर्मी लागेल, असा घाव घातला. आघाडीच्या नेत्यांमधील एकजुटीचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जावा, यासाठी वज्रमूठ सभा घेण्यात येत होत्या. छत्रपती संभाजीनगर, नागपूरनंतर मुंबईतील सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, आघाडीतील अंतर्विरोधामुळे मुंबईतील सभा अखेरची सभा ठरेल, असे दावे भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत होते. उन्हाच्या कारणामुळे सभा स्थगित करून आघाडीने भाजपच्या दाव्याची पुष्टीच केली. या सगळ्या परिस्थितीचे बारीक अवलोकन केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होते. पहिल्या फळीतील नेत्यांतच टोकाचे मतभेद असतील, तर आघाडी कशी पुढे जाणार, असा प्रश्न आहे. कुणी कितीही दावे केले तरी, ही वज्रमूठ सैल पडू लागली आहे आणि आघाडीला तडे जाऊ लागले आहेत!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT