Latest

महाविकास आघाडीचा पोपट मेला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमृता चौगुले

पुणे : वज्रमूठ सभेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत. शरद पवार यांनी आघाडीतील नेत्यांबद्दल आपल्या पुस्तकात लिहिले आहे. त्यावर आम्ही बोलण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुरते कळले आहे की, आपला पोपट मेलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी पोपट जिवंत आहे हे दाखवावे लागते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महापालिकेच्या वतीने बालेवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या वज्रमूठीला आधीच तडे गेलेले आहेत. कोणी कसे बसायचे, कुठे उभे राहायचे, कोणी बोलायचे यावरून वाद सुरू आहेत. त्यांच्याबद्दल पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. त्यामुळे आम्ही विरोधक आहोत त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेचे संपूर्ण प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे.

त्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही. मात्र, एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि 25 वर्षे विधानसभेत काम केलेला व्यक्ती म्हणून मला असे वाटते की, आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरते समजले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण, आपल्या कार्यकर्त्यांसाठी तो जिवंत आहे, असे त्यांना बोलावे लागते. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, जिल्हा विभागाच्या अनेक मागण्या आमच्यापुढे आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा विचार करता येणार नाही. सर्व जिल्ह्यांचा एकच विचार करावा लागेल.

SCROLL FOR NEXT