Latest

Uddhav Thackeray Resign : आघाडीचे सरकार कोसळले; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह आमदारकीचाही राजीनामा

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत उद्या, गुरूवारी बहुमत चाचणी होणार, हे स्पष्ट झाल्यानंतर रात्री साडेनऊनंतर फेसबूक लाईव्हवरून राज्यातील जनतेशी संवाद साधत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Resign) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे.

फेसबूक लाईव्ह संवादात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Resign) म्हणाले की, ज्यांनी मोठे केले त्यांनाच काही जण विसरले. ज्यांना सर्व काही दिले ते नाराज झाले आणि मातोश्रीवर येणाऱ्या साध्या माणसांनी मात्र प्रेम दिले. हिंमतीने सोबत राहिले. नात्याच्या जोरावरच शिवसेना मजबूत उभी राहिली. अनेक आव्हाने शिवसेनेने परतवली. न्यायदेवतेचा निकाल मान्य. राज्यपालांनी लोकशाहीचा मान राखला, असा टोलाही त्यांनी कोश्यारी यांना लगावला. तसेच १२ आमदारांना नियुक्त केल्यास तुमच्याबद्दलचा आदर द्विगुणित होईल. दगा देणार असे वाटत होते ते सोबत राहिले. मला काँग्रेसचे अशोक चव्हाण म्हणाले की, आमच्यावर नाराजी असेल तर काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, पण त्यांना परत या म्हणावे.

मुख्यमंत्री पदासोबत उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा राजीनामा

यावेळी फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, न्याय देवतेचा निकालाचा मान राखत हा निकाला मान्य असल्याचे म्हणाले. तसेच मी आधीपासून माझ्या एका तरी आमदाराने तुम्ही मुख्यमंत्री नको असे म्हंटले तर राजीनामा देतो असे म्हणालो होतो. आता या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापेक्षा मी आपणहून या पदाचा राजीनामा देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री झाल्यामुळे मी विधान परिषदेचे सदस्यत्व स्विकारले होते. आता मी जनतेचा मुख्यमंत्रीच राहिलो नाही तर मला विधान परिषदेच्या सदस्यपदात देखिल रस नाही त्यामुळे मी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखिल राजीनामा देत असल्याचे उद्वव ठाकरे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT