Latest

प्रासंगिक : फुले-आंबेडकर : एक वैचारिक ऋणानुबंध

Arun Patil

महात्मा फुले यांचे धोरण, तत्त्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे, अशी धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. महात्मा फुले यांचे बोट धरून डॉ. बाबासाहेब लोकशाहीच्या मार्गावरून चालत राहतात आणि लोकशाही मूल्ये देशाला प्रदान करण्यासाठी हयात वेचतात, हे या गुरू-शिष्य जोडीचे वैशिष्ट्य आहे.

11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 28 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथे षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. या समारंभात उपस्थितांशी संवाद साधताना बाबासाहेबांनी, 'माझं आयुष्य बुद्ध, कबीर, फुले या तीन गुरूंनी आणि प्रज्ञा, स्वाभिमान व शील या तीन उपास्य दैवतांनी घडविले आहे,' असे उद्गार काढले होते. बाबासाहेब म्हणतात, माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरू बुद्ध होत. मॅट्रिक पास झालो तेव्हा दादा केळुस्करांनी मला बुद्धचरित्र बक्षीस दिलं. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला. त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे आणि माझी अशी ठाम खात्री आहे की, जगाचं कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल. माझे दुसरे गुरू कबीर होत. कबिराच्या जीवनाचा आणि तत्त्वाचाही माझ्यावर फार मोठा परिणाम आहे. मी मोठा कोणालाच-अगदी गांधींनाही, म्हटले नाही. कबिराने म्हटले आहे, 'मानुष होना कठीण है। तो साधु क्या बने?' जो माणूस झाला नाही, तो महात्मा कसा होईल? आणि माझे तिसरे गुरू म्हणजे ज्योतिबा फुले होत. ब्राह्मणेतरांचे खरे गुरू तेच होते. शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुले यांनीच दिले आणि शिकविले. पूर्वीच्या (ब्राह्मणेतर पक्ष) राजकारणात आम्ही ज्योतिबांच्या मार्गानेच जात होतो. पुढे मराठे आमच्यातून फुटले. कोणी काँग्रेसमध्ये, तर कोणी हिंदू महासभेत गेले. कोणी कोठेही गेले, तरी आम्ही जोतिरावांच्या मार्गानेच जात राहू. काही झाले तरी ज्योतिबांचा मार्ग सोडणार नाही.

महात्मा फुले यांना गुरुपद प्रदान करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणखी एकेठिकाणी अधिक नेमकेपणाने त्यामागील कारण दिले आहे. नाशिक येथील (17 नोव्हेंबर 1951) सभेत बाबासाहेब सांगतात, ज्योतिबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. आत्मविश्वासाने मी आज म्हणू शकतो की, मीच तेवढा आज ज्योतिबांना एकनिष्ठ राहिलो आहे आणि मला अशी खात्री आहे की, या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा कोणताही पक्ष पुढे आला, त्याने कोणतेही नाव धारण केले, तरी त्याला ज्योतिबांचे धोरण, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे जावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे. समाजातील 80 टक्के लोकांना विद्याप्राप्ती करू न देणे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे. मागासलेल्या वर्गांच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष आज जनतेचे नेतृत्व घेऊ शकत नाही, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे.

महात्मा फुले यांचे धोरण, तत्त्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे, अशी धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. या लोकशाही मूल्यांची देशामध्ये प्रस्थापना करावयाची, तर त्यास महात्मा फुले यांचा मार्ग स्वीकारण्याखेरीज पर्याय नाही, या भावनेतून बाबासाहेब महात्मा फुले यांचे बोट धरून लोकशाहीच्या मार्गावरून चालत राहतात आणि ती मूल्ये या देशाला प्रदान करण्यासाठी हयात वेचतात, हे या गुरू-शिष्य जोडीचे वैशिष्ट्य आहे. बाबासाहेब ज्या तीन महामानवांना आपले गुरू घोषित करतात, ते सर्वच बाबासाहेबांच्या जन्माआधी होऊन गेलेले आहेत. अगदी महात्मा फुले यांचे 1890 मध्ये निधन झाले आणि त्यानंतर अवघ्या पाचेक महिन्यांत बाबासाहेबांचा महू इथे जन्म झाला. मात्र, या सर्वांनी जी मानवतेची मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी अखंड प्रयत्न केले, त्या मूल्यांशी बाबासाहेब आपले शिष्यत्वाचे नाते जोडतात.

बाबासाहेबांनी 'शुद्र पूर्वी कोण होते?' हा आपला ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला. अतिशय मार्मिक अशी ही अर्पणपत्रिका आहे. त्यात आंबेडकर म्हणतात की, 'हिंदू समाजातील कनिष्ठ वर्गांना ते उच्च जातीचे गुलाम आहेत, याची जाणीव त्यांनी (म. फुले यांनी) करून दिली आणि परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविणे, यापेक्षा सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना जास्त मूलगामी आहे, असा मूलमंत्र घरोघरी पोहोचविला, त्या राष्ट्रपिता महात्मा फुले या आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ अशा शुद्रास हा ग्रंथ सादर अर्पण.' या वरून महात्मा फुले यांच्याबद्दल डॉ. आंबेडकर यांच्या मनात असलेला अतीव आदर आपल्या लक्षात येऊ शकेल.

महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील अत्यंत मूलभूत अशा समाजपरिवर्तनाच्या चळवळीचे आद्यप्रवर्तक होते. हिंदू समाजातील शुद्रातिशुद्रांच्या व्यथा त्यांनी वेशीवर टांगल्या. सावकारी पाशात जखडलेल्या, कर्जबाजारीपणापायी हैराण झालेल्या शेतकर्‍यांच्या गार्‍हाण्यांना त्यांनी वाचा फोडली. या कष्टकर्‍यांचे अज्ञान आणि दारिद्य्र हे ईश्वरनिर्मित नसून, त्याचे मूळ आपल्या प्रस्थापित समाजव्यवस्थेमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात आणून दिले. म्हणूनच या व्यवस्थेतील धर्माधिष्ठित बौद्धिक गुलामगिरी, सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषण यांच्याकडे त्यांनी सर्वप्रथम लोकांचे लक्ष वेधले. एकोणिसाव्या शतकात अनेक कर्ते समाजसुधारक होऊन गेले. त्यात बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, भांडारकर, रानडे, विष्णुशास्त्री, न्या. रानडे आदींचा उल्लेख करता येईल. त्यांची द़ृष्टीही उदार आणि व्यापक होती. त्यांची सामाजिक कर्तव्यबुद्धी कौतुकास्पद होती, तरीही त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित राहिले. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांच्या कार्याची दिशा मात्र अगदी भिन्न स्वरूपाची होती. या समाजातल्या परंपरागत जीवनसरणीतील अनिष्ट व अन्यायकारक रूढी-प्रथांवर तर त्यांनी सातत्याने कोरडे ओढलेच; शिवाय रूढीप्रामाण्य आणि सामाजिक विषमतेला दैवी अधिष्ठान प्राप्त करून देणार्‍या धर्मसंस्थेवरच त्यांनी हल्ला चढविला. दलित, शोषित, वंचित या वर्गांसह जातधर्मनिरपेक्ष शोषणाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या स्त्रियांचा कैवार घेऊन त्यांना त्यांचे नैसर्गिक मानवी अधिकार प्राप्त करून देण्यासाठी ते जन्मभर झगडले. बहुजन समाजातील नवशिक्षितांना आपल्यावरील सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत राहिले. स्वतःच्या विवेकबुद्धीला जे पटेल, ते आचरणात आणताना फुले डगमगले नाहीत. महात्मा फुले यांनी न्याय व समता यावर आधारलेली आदर्श समाजरचना अस्तित्वात आणण्याचा ध्येयवाद स्वीकारलेला होता. त्यासाठी ते अखेरपर्यंत झटले. तळागाळातील शुद्रातिशुद्रांच्या सुख-दुःखांशी ते तादात्म्य पावले. फुले यांची ही तादात्म्यता आणि कृतिशीलता यामध्येच त्यांचे महात्मेपण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही व्यक्तीचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, समता, सामाजिक न्याय याच मानवतावादी लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी सारा संघर्ष मांडलेला होता. कृतिशीलतेच्या बाबतीतही ते खूपच आक्रमक होते. फुले यांनी निर्मिकाच्या स्वरूपात का होईना; पण ईश्वराचे अस्तित्व मानले; पण बाबासाहेबांनी तेही नाकारण्याचे धाडस दाखविले. महात्मा फुले यांचा विवेकवाद, विज्ञाननिष्ठा हे गुणही बाबासाहेबांमध्ये प्रकर्षाने आढळून येतात. धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या बाबतीत बाबासाहेब अधिक आक्रमक होतात. चातुर्वर्ण्याचा मनोरा उद्ध्वस्त केल्याखेरीज हिंदू समाजातील जातिप्रथेचे उच्चाटन अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 'जातिनिर्मूलन' या ग्रंथात जातीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे त्याचप्रमाणे जातिव्यवस्था ही श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी असल्याचे ठाम प्रतिपादन बाबासाहेबांनी केले आहे. जातिनिर्मूलनाचे उपायही बाबासाहेब सांगतात. धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह, व्यापक लोकशिक्षण आणि संसाधनांचे फेरवाटप या चतुःसूत्रीच्या बळावरच जातिप्रथेचे समूळ उच्चाटन करता येणे शक्य असल्याचा निष्कर्ष मांडतात. त्याखेरीज स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांची प्रस्थापना अशक्य असल्याचे सांगतात. बाबासाहेबांचा चातुर्वर्ण्याविरोधातील हा लढा भारतीय समाजाला, विशेषतः अस्पृश्यांना केवळ शैक्षणिक, सामाजिक व राजकीयद़ृष्ट्या जागरूक करण्यासाठीच नव्हता, तर त्यांच्यामध्ये सामाजिक-आर्थिक उत्थानाच्या जाणिवा निर्माण करण्यासाठीचाही होता, ही बाब लक्षात घेतली जाणे फार आवश्यक आहे.

'गुलामगिरी', 'शेतकर्‍याचा असूड' आणि अखंडादी काव्यरचनांमधून महात्मा फुले शेतकर्‍यांच्या ज्या समस्यांचे सूचन करतात, त्या समस्यांचे पुढील काळात निराकरण करण्यासाठी बाबासाहेब झटताना दिसतात. महार वतनामुळे अस्पृश्य समाज स्वाभिमानशून्य व अल्पसंतुष्ट झाल्याची बाब हेरून बाबासाहेबांनी महार वतन नष्ट करण्याचे विधेयक मांडले. याच्या अनुषंगाने लोकांना सविस्तर अवगत करण्यासाठी त्यांनी 'महार आणि त्यांचे वतन अथवा विसाव्या शतकातील गुलामगिरी' ही पुस्तिका लिहिली. अस्पृश्यांनी हीन दर्जाची कामे सोडून आर्थिकद़ृष्ट्या स्वावलंबी बनावे आणि आपल्या मानवी हक्कांसाठी संघर्षरत व्हावे, ही अपेक्षा घेऊन बाबासाहेब त्यांच्यावरील गुलामगिरीचे जोखड भिरकावून देण्यासाठी पुढे सरसावतात. बाबासाहेब त्यानंतर लगोलग सावकारी नियंत्रण विधेयक मांडतात. सावकारांकडून पिळवणूक झालेला केवळ अस्पृश्यवर्गच नाही, तर सर्वच जाती-जमातींमधील गोरगरिबांचे सावकारांकडून शोषण होते. त्यामुळे सावकारांसाठी व्यावसायिक परवाना, त्याचे वार्षिक नूतनीकरण, सावकारी गैरव्यवहार आढळल्यास परवाना रद्द करण्याची तरतूद, कर्ज देण्याबाबतच्या लेखी व्यवहाराची सोय, धनकोने ऋणकोस द्यावयाचे कर्जव्यवहाराचे खाते पुस्तक आदी तरतुदी या विधेयकामध्ये होत्या.

बाबासाहेबांनी खोती व तालुकदारी पद्धती नष्ट करण्यासाठी आणलेले विधेयक फारच महत्त्वाचे होते. खोतांकडून शेतकरी कुळांचे होणारे शोषण थांबविण्यासाठी व त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी हे विधेयक त्यांनी मांडले. नाममात्र मोबदल्यात कुळांकडून कष्टाची कामे करून घेण्यास त्यांनी विरोध केला. खोतांनी त्याविरोधात दाखल केलेल्या दाव्यांमध्ये कुळांच्या बाजूने बॅरिस्टर बाबासाहेब उभे राहिले आणि त्यांनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला. सुमारे 20 हजार शेतकर्‍यांचा मोर्चा (10 जानेवारी 1938) त्यांनी आझाद मैदानापासून कौन्सिल हॉलपर्यंत नेला. बाबासाहेबांनी पुढे केंद्रीय मजूरमंत्री या नात्याने कामगारांच्या मानवी व नैसर्गिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या.

डॉ. आलोक जत्राटकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.