Latest

समतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर

अमृता चौगुले

महात्मा बसवेश्वर यांचा कालखंड 1105 ते 1167 असा आहे. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी ही त्यांची जन्मभूमी. बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण व महाराष्ट्रातील मंगळवेढा ही त्यांची कर्मभूमी. कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम ही त्यांची ऐक्यभूमी आहे. कर्नाटक शासनाने या क्षेत्राला राष्ट्रीय पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. बसवेश्वरांची माता आदलांबिका, तर पिता मादरस हे धार्मिक वृत्तीचे होते. बसवेश्वर हे 'महात्मा बसवेश्वर' जगत्ज्योती बसवेश्वर म्हणून विशेष परिचित आहेत.

बाराव्या शतकात राजकीय क्षेत्रात अनागोंदी कारभार होता. सामाजिक क्षेत्रात उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, विषमता, मानवा-मानवामध्ये भेद अशी परिस्थिती होती. धार्मिक क्षेत्रात अनिष्ठ चालीरीती, रूढी, परंपरा होत्या. सर्वच क्षेत्रांतील परिस्थितीमुळे सामान्य माणूस त्रासलेला होता. महात्मा बसवेश्वर हे 'कल्याण' या राज्याचे बरीच वर्षे पंतप्रधान होते. मंगळवेढ्यात त्यांचे 21 वर्षे वास्तव होते. राजसत्तेचा उपयोग त्यांनी खर्‍या अर्थाने जनकल्याणासाठी केला. या भूमीवर नैसर्गिकरित्या मानवाचा जन्म सर्व अर्थाने समान आहे. तेथे मानवा-मानवामध्ये भेद निर्माण होऊच शकत नाही. हा त्यांचा विचार होता.

स्त्रीयांना कुटुंबात व समाजात गौण स्थान होते. स्त्री म्हणजे गुलाम, स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू अशी समाजाची धारणा होती. स्त्रीयावर अन्याय-अत्याचार होत होता. समाजात सती जाणे, बालहत्या, बालविवाह अशा अनिष्ट चालीरिती रुढ होत्या. अशावेळी स्त्रीचे त्यागी, सेवाभावी वृत्तीचे स्वरूप समाजाला पटवून देण्याचे कार्य बसवेश्वरांनी केले. स्त्रियांचा उद्धार झाल्याशिवाय कुटुंबाचा व समाजाचा उद्धार होणार नाही, हा त्यांचा दृष्टिकोन होता. स्त्रियांना कुटुंबात व समाजात स्वातंत्र्य व समानता मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा कालबाह्य रूढी, परंपरा नष्ट करून नवीन जीवनमूल्ये रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मानवी जीवनाला नवी दिशा दिली. त्यामुळे पुढे स्त्री उद्धार चळवळ हाती घेणार्‍या कार्यकर्त्यांचा मार्ग सुकर झाला. यालाच 'बसव क्रांती' असे म्हटले जाते.

देवाला प्रसन्न करण्यासाठी विविध वस्तू भेट दिल्या पाहिजेत, देवळे बांधणार्‍यांना स्वर्गप्राप्ती होते अशा कल्पना अस्तित्वात होत्या. पुजार्‍याशिवाय इतरांना प्रवेश नाकारून सामान्यावर अन्याय केला जात होता. ही धार्मिक विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

देह म्हणजेच एक महान मंदिर आहे, हा संदेश बसवेश्वरांनी दिला. धार्मिक क्षेत्रात आचरण्यास अत्यंत सोपी शिवभक्ती व लिंगपूजा यावर त्यांनी भर दिला. त्यांना कर्मकांड, हिंसात्मक व यज्ञयागाने भारावलेली अमंगलकारक व परपिडाकारक पूजा अमान्य आहे. भक्त व परमेश्वर यांचे नाते अभेद्य असल्याने पुजार्‍याच्या दलालीची गरज नाही. शुद्ध भक्ती म्हणजे खरा मुक्तीमार्ग होय, असा सोपा मार्ग त्यांनी समाजाला दिला. वेगवेगळ्या जाती-जमातींच्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण केला. त्याकरिता 'कल्याण' येथे 'अनुभव मंडप' ही संस्था त्यांनी स्थापन केली. वेगवेगळ्या जातींमधील भक्त तेथे एकत्र जमत. विविध विषयांवर चर्चा करीत. चर्चेत स्त्रियांनाही प्रवेश होता.

बसवेश्वरांनी आर्थिक क्षेत्रात श्रमाला महत्त्व दिले. ऐतखाऊ लोकांना कष्टाचे महत्त्व समजावून सांगून त्यांचे मनपरिवर्तन केले. भिक्षावृत्ती ताबडतोब बंद केली. श्रमाला 'कायक' असे त्यांनी नाव दिले. प्रत्येकाने 'कायक' केले पाहिजे. 'कायका'मध्ये उच्च-नीच असा भेद नाही. 'कायक' प्रामाणिकपणे करावे. 'कायक' समाजाला हानिकारक न ठरता ते पूरक असावे. अशी 'कायक'वृत्ती जेव्हा श्रमिकांच्या ठिकाणी निर्माण होईल तेव्हा बेकारी नष्ट होण्यास मदत होईल. 'कायकवे कैलास' याचा अर्थ श्रम म्हणजेच मुक्ती. श्रम हाच
स्वर्ग आहे, हा मूलमंत्र त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेला दिला.

बसवेश्वरांचा भर हा माणूस घडविण्यावर होता. या कार्यात त्यांना अल्लमप्रभू, चन्नबसवेश्वर, सिद्धरामेश्वर, अक्कमहादेवी अशा जवळजवळ 213 वचनकारांचे सहकार्य लाभले. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, अध्यात्म, तत्त्वज्ञान, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रांत नवीन व क्रांतिकारी विचारांची त्यांनी पेरणी केली. आज काळ संक्रमणाचा आहे. अशावेळी महात्मा बसवेश्वरांना देवत्त्व देऊन भागणार नाही. मंदिरे उभारून चार भिंतींच्या आड कोंडून चालणार नाही. एक महान, क्रांतिकारक म्हणून त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या विचाराचे, शिकवणुकीचे, तत्त्वज्ञानाचे चिंतन व आचरण म्हणजेच त्यांचे खरे स्मरण होय.

– प्रा. डॉ. आप्पासाहेब कारदगे

SCROLL FOR NEXT