Latest

महती नवदुर्गांची : पद्मावतीदेवी (पद्मांबिका)

स्वालिया न. शिकलगार

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.

नवदुर्गांतील तृतीय दुर्गा देवी म्हणजेच श्री पद्मावतीदेवी (पद्मांबिका) होय. मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरात या देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती अडीच फूट उंचीची, शेंदूर लावलेली चित्ताकर्षक आहे. श्री विष्णू, नाईकबा, नागराज, हनुमान, सटवाई, गजेंद्रलक्ष्मी, गणेश, अगस्ती लोपामुद्रा, प्रल्हादेश्वर आदी परिवार देवता आहेत.

पद्मा व पद्मालय नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या परिसरात पूर्वी पद्माळे नावाचे तळे होते. येथे भक्त प्रल्हादाने घोर तपश्चर्या करून नृसिंहास प्रसन्न करवून पितृद्रोहाचे पाप नष्ट केले. पापाचा नाश करणारे स्थान, जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान, अनेकांचे कुलदैवत, अंतगृहपालिकेतील आग्नेयेची देवता असा या देवीचा परिचय आहे.

SCROLL FOR NEXT