Latest

पीक उत्पादकतेत महाराष्ट्र दहाव्यास्थानी!

दिनेश चोरगे

सांगली : प्रगत मानला जात असलेला महाराष्ट्र देशातील प्रमुख राज्यांत पिकांच्या त्रैवार्षिक सरासरी उत्पादकतेत मात्र दहाव्या स्थानावर असल्याची माहिती पुढे आली आहे. यात पंजाबचा अव्वल क्रमांक राहिला आहे. मात्र ऊस उत्पादनात राज्याचा देशात तिसरा क्रमांक राहिला आहे. तसेच कापसाच्या प्रतिहेक्टरी उतार्‍यात नीचांकीस्थानी आहे. सातत्याने एक आणि एकच पीक घेतल्याने शेतीची उत्पादकता घटत आहे. परिणामी शेती करणे सामान्य शेतकर्‍यांसाठी आतबट्ट्याचे ठरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर त्रैवार्षिक सरासरी उत्पादकतेबाबतची समोर आलेली आकडेवारी ही शेती, सिंचन तसेच सहकार क्षेत्रात प्रगत मानल्या जात असलेल्या महाराष्ट्रासाठी काही प्रमाणात कमीपणाची ठरणार आहे.

देशातील निवडक राज्यांतील निवडक पिकांची सरासरी वार्षिक उत्पादकता पाहिली, तर महाराष्ट्राचे स्थान स्पष्ट होते. सन 2018 ते 21 दरम्यानच्या निवडक पिकांच्या त्रैवार्षिक सरासरी उत्पादकतेत पंजाब देशात अव्वल स्थानावर असल्याचे स्पष्ट होते. त्रैवार्षिक सरासरी उत्पादकता निश्चित करताना प्रतिहेक्टरमागे निघालेले पिकांचे उत्पादन आणि उसासाठी प्रतिहेक्टर उसामागे निघालेल्या टनेजची आकडेवारी पायाभूत धरली जाते. तसेच यासाठी तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस आणि ऊस या प्रमुख पिकांचा विचार केला जातो.
त्रैवार्षिक सरासरी उत्पादकतेत सर्वाधिक अव्वल स्थानावर पंजाब राज्य आहे. या ठिकाणी प्रतिहेक्टर 4614 किलोग्रॅम तृणधान्याचे उत्पादन निघते. याचठिकाणी कडधान्याचे प्रतिहेक्टरमागे 927 किलोग्रॅम, तर तेलबियांचे 1506 किलोगॅ्रम उत्पादन मिळते. तसेच कापसाचे प्रतिहेक्टरमागे 764 किलोग्रॅमचे उत्पादन मिळते. या ठिकाणी प्रतिहेक्टरमागे ऊस मात्र 82 टन निघतो. महाराष्ट्रात हेच आकडे अनुक्रमे 1455, 839, 1221, 298 आणि 84 असे आहेत. उसाची सर्वाधिक हेक्टरी उत्पादकता ही तामिळनाडूत आहे. या ठिकाणी प्रतिहेक्टरमागे तब्बल 105 टन उसाचे उत्पादन निघते. पिकांची त्रैवार्षिक सरासरी उत्पादकता निश्चित करण्यासाठी देशातील आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्यांतील तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस, ऊस या पिकांची पाहणी करण्यात येते.

एकीकडे वाढता खतांचा वापर हा जमिनीवर दुष्परिणाम करणारा ठरत आहे. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आजारांचे प्रमाण वाढले. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी वैज्ञानिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतामध्ये पोषक तत्त्वांचा गरजेपेक्षा अधिक वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी होते. म्हणूनच कृषी क्षेत्राशी संबंधित असणार्‍यांनी आणि सरकारने एकत्रित काम करून, जमिनीवर रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT