Latest

कृषी अधिकार्‍यांच्या धमकीप्रकरणी आमदार बांगर यांचा निषेध, महाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघ आक्रमक

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मुद्दयावरुन कळमनुरी-औढ्याचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना मोठ्या जनसमुदायासमोर अर्वाच्य भाषेमध्ये बोलून सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला आहे. शिवाय त्यांना मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघाने आक्रमक भुमिका घेत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.

कृषी आयुक्त धीरज कुमार यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने आणि कृषी आयुक्तालयातील संचालक, अधिकारी-कर्मचार्‍यांनी सोमवारी निवेदन देत लक्ष वेधले. त्यावर हिंगोलीप्रमाणेच पुन्हा अशा प्रकारच्या घटना लोकप्रतिनिधींमार्फत होणार नाहीत, यासाठीची आग्रही भुमिका संघटनेने निवेदनात मांडली आहे. त्या दृष्टीने प्राप्त निवेदन राज्य सरकारकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती संघटनेकडून कळविण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या गेलेल्या अशा अपमानास्पद वागणुकीमुळे खात्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे मनोबल खचलेले आहे. राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांनी या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.17) ठिकठिकाणी काम बंद आंदोलन करीत संबंधित जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदनही दिले.

कृषी आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांनी एकत्र येत कृषी विभागाचे पालक तथा कृषी आयुक्त धीरज कुमार यांची शिष्टमंडळाने भेट घेत या बाबतचे निवेदन दिले. त्यामध्ये राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे, कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे, पांडुरंग शेळके, आत्माचे प्रकल्प संचालक उदय देशमुख, पुणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, कृषी उपसंचालक शिरीष जाधव, पांडुरंग शिगेदार, दयानंद जाधव, महेश झेंडे आदींसह अन्य अधिकार्‍यांचा समावेश आहे. दरम्यान, संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनाही निवेदन दिलेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT