Latest

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत की नाही हे ठरवायला वेळ लागेल : आमदार भरत गोगावले

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकमुखाने एकनाथ शिंदे (Maharashtra Political Crisis) यांना गटनेते म्हणून निवड केली. आता या सर्व आमदारांबाबतचे सर्व निर्णय तेच घेणार असल्याचे रायगडचे व शिवसनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना आमचा नेता ठरविण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे आणि त्यावर आम्ही विचार करु, असे देखिल त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले.

यावेळी आमदार भरत गोगावले (Maharashtra Political Crisis) म्हणाले, आमच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार व नेते ढवळाढवळ करत आहेत. आम्ही मंजूर केलेली कामे त्यांनी मंजूर केली असे सांगत होते. ते आमच्या मतदारसंघात त्याचा पक्ष वाढवू पहात होते. त्यांनी वेळोवेळी आमची गळचेपी केली, आम्हाला डावलले गेले अशी तक्रार आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. पण, शिवसेना पक्षप्रमुखांनी या तक्रारींकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले म्हणून आम्ही बंडखोरी केली आहे.

पुढे भरत गोगावले (Maharashtra Political Crisis) म्हणाले, आमच्या आमदारांची संख्या वाढत आहे. आणखी आमदार येऊन मिळत आहेत. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जायचे नाही. त्यामुळे भाजप आम्हाला सहकार्य करेल असेही आमदार गोगावले यावेळी म्हणाले. तसेच आम्ही आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत तर भाजप सोबत तेच बोलतील असे देखिल भरत गोगावले म्हणाले.

शिंदेसेनेला भाजपचा पाठिंबा

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या बैठकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे पण अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पाठिंब्याबाबत संकेत दिले आहेत. शिंदे गटात सामिल झालेल्या आमदारांचे प्रतिनिधित्व करत आमदार तानाजी जाधव यांनी एकनाथ शिंदे हे आपल्या गटाचे नेते असतील असे त्यांनी जाहीर केले.

एकनाथ शिंदे व्हिडिओमध्ये म्हणतात की, भाजपने पाकिस्तानला धडा शिकवलाय. आपण एकजुटीने राहू. कुठेही काहीही कमी पडू दिले जाणार नाही. मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. महाशक्ती आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे….

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची बैठक सुरू असल्याचे दिसत आहे. यावेळी एकनाथ शिंदे सर्व आमदारांच्या पुढे खुर्चीत बसले आहेत. त्यांच्या समोर आमदार बसले आहेत. यावेळी आमदार तानाजी सावंत उठतात आणि आमच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा तुम्ही घ्याल. तुम्ही आमचे गटनेते आहात, असे ते स्पष्ट करतात. त्यानंतर सर्व आमदार टाळ्यांचा कडकडाट करत शिंदेंचे अभिनंदन करतात आणि हात वर करून तानाजी सावंतांच्या प्रस्तावावर अनुमोदन देतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT