नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणार्या नवाब मलिक यांचा महायुतीमधील प्रवेश रोखल्यानंतर दुसर्याच दिवशी शुक्रवारी विरोधकांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरून अजित पवार गटाला कोंडीत पकडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून दट्ट्या देताच अजित पवार गटाने मलिक यांना वार्यावर सोडले. पण आधीपासून महायुतीमध्ये दाखल झालेले प्रफुल्ल पटेल यांनीही दाऊदचा उजवा हात इक्बाल मिर्चीशी थेट व्यवहार केला आणि या व्यवहारातून घेतलेले पटेल यांचे मजलेही ईडीने जप्त केले आहेत. असे पटेल महायुतीमध्ये कसे चालतात, असा हल्ला विरोधकांनी चढवला.
आधी नवाब मलिक आणि आता प्रफुल्ल पटेल या दोघांवरूनही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप कोंडीत सापडले आहेत. गुरुवारी नवाब मलिक अजित पवार गटासोबत सत्तारूढ बाकांवर बसलेले दिसताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेत महायुतीवर हल्ला चढवला आणि मलिक यांचे दाऊद कनेक्शन बघता त्यांना दूरच ठेवा, असे बजावणारे पत्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले. या पत्राचे कवित्व अद्याप संपलेले नाही.
गेल्या 24 तासांत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि भाजप या तिघांनीही मलिकांशी संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता नवाब मलिक कोणत्या गटात जाणार, असा प्रश्नही आहे.
अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही मलिक यांच्याशी संबंध नाकारले आहेत. आम्ही केवळ त्यांच्या आरोग्याची विचारपूस करायला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. फडणवीस यांच्या पत्राचा वेगळा अर्थ काढू नका. विधानसभेत नवाब कुठे बसले, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यांच्याकडे विधानसभेत बसण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आमच्या गटाच्या आमदारांच्या यादीतही त्यांचा समावेश नाही. नवाब मलिक यांची कोणतीही कागदपत्रे किंवा प्रतिज्ञापत्र आमच्या बाजूने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही, असा दावा पटेल यांनी केला.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले आणि नवाब मलिक महायुतीमध्ये नकोत, हीच भूमिका घेतली.
नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर
हे सारे वादळ उठले असतानाही नवाब मलिक जाहीरपणे शुक्रवारीही सत्ताधारी बाकांवरच अजित पवार गटासोबतच बसले होते. फडणवीस यांच्या पत्रानंतरही अजित पवार गटाने मलिकांना सोबत ठेवल्याचे चित्र सभागृहात दिसले. याबद्दल छेडले असता फडणवीस यांनी पत्रातून त्यांची भूमिका स्पष्ट केली की, मी माझी भूमिका सांगेन, अशी सावध प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. मलिक यांच्या संदर्भात मला फडणवीसांचे पत्र मिळाले असून मी ते वाचले आहे. त्याचे काय करायचे ते मी बघतो, असेही अजित पवार म्हणाले.
फडणवीस यांनी पत्र जाहीर करून नवाब मलिकांचा आपल्या गटातील प्रवेश रोखणे अजित पवारांना रुचलेले नाही. फडणवीसांनी जाहीर पत्राद्वारे भूमिका मांडण्याऐवजी आपल्याशी या विषयावर खासगीत चर्चा करायला हवी होती, असे त्यांचे मत होते. या पत्रानंतर नाराज अजित पवारांनी पुढील दोन दिवसांचे कार्यक्रमही रद्द केल्याचे सांगितले जात होते. मात्र सत्ताचक्रे अशी काही फिरली की, नवाब मलिकांशी संबंध जाहीरपणे तोडण्याची नमती भूमिका अजित पवारांना घ्यावी लागली.
आता प्रफुल्ल पटेल रडारवर!
गुरुवारी सभागृहातच नवाब मलिक यांनी सत्तारूढ बाकांवर बसण्याला आक्षेप घेत हा वाद उभे करणारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी प्रफुल्ल पटेल यांचा गँगस्टरसोबत संबंध असल्याचा आरोप करीत सरकारला धारेवर धरले. गोंदिया विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करणारे पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत. दाऊदच्या हस्तकासोबत पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने 'ईडी'ने पटेल यांची संपत्ती जप्त केली, मलिक यांच्याबाबत ज्या तीव्र भावना आहेत. तशाच भावना पटेल यांच्याबाबत आहेत काय, असा सवाल त्यांनी फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केला. दानवे यांचा रोख पटेल यांनी इक्बाल मिर्चीकडून खरेदी केलेल्या आणि नंतर जप्त झालेल्या मालमत्तेकडे आहे.
भूमिका दुटप्पीपणाची : पटोले
माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत. त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात, असा सवाल करतानाच अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चढविला.
पटेल विरुद्ध चव्हाण
देवेंद्र फडणवीस यांनी पत्र न लिहिता थेट अजित पवारांशी बोलायला काय हरकत होती, असा सवाल आमदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देत पटेल म्हणाले, ज्यांनी सल्ला द्यायची गरज नाही, तेही सल्ला देत आहेत.
नवाब सरकारसोबत; पत्र क्रमांक 42 : प्रभूंचा दावा
नवाब मलिक आमच्या गटात नाहीत आणि त्यांच्याशी आमचा राजकीय संबंध नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला असला तरी तो शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार सुनील प्रभू यांनी खोडून काढला. मलिक यांनी सरकारला पाठिंबा दिला असून त्यांच्या पाठिंब्याचे पत्र 42 व्या क्रमांकावर आहे, असे प्रभू यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले.