Latest

Mumbai ATS Action : एटीएसची बोरिवलीत मोठी कारवाई! गेस्ट हाऊसमधून 6 जणांना शस्त्रांसह अटक

रणजित गायकवाड

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Mumbai ATS Action : दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईच्या बोरिवलीमध्ये मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. बोरिवली येथील एका एका गेस्ट हाऊसमध्ये काही लोक लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात गेस्ट हाऊसमधून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एटीएसशी संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व लोक दिल्लीचे रहिवासी आहेत. आता हे लोक दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले होते? याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.  मुंबई शहरात मोठा कट रचत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त करून तपासाला सुरूवात केली आहे. Mumbai ATS Action

ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले आहे. दिल्लीतून काही तरुण घातक शस्त्रे घेऊन आले असून ते सर्वजण बोरिवलीतील एलोरा गेस्ट हाऊसमध्ये राहत असल्याची माहिती एटीएसच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने गेस्ट हाऊसमध्ये छापा टाकून तिथे असलेल्या सहा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

त्यांच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना सहा पिस्तूल आणि २९ काडतुसे सापडले. या शस्त्रांविषयी त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. अटक आरोपी दिल्लीसह मुंबईचे रहिवाशी आहे. एका आरोपीविरुद्ध हत्येचा तर दुसर्‍या आरोपीविरुद्ध दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे बोलले जाते. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींना पुढील चौकशीसाठी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT