Latest

Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.

अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.

गंभीर भूमिकांबरोबरच विनोदी चित्रपटात सहज अभिनय साकारणारा अभिनेता म्हणून अशोक सराफ यांची ख्याती. काही चित्रपटांतूनही ते खलनायकाच्या भूमिकेतही दिसले. परंतु, गंभीर आणि खलनायकांच्या भूमिकांपेक्षा त्यांच्या विनोदी भूमिका मात्र अधिक गाजल्या. बोलण्याची विशेष लकब आणि दमदार आवाजाने अशोक मामा यांची ओळख एक विनोदी कलाकार म्हणून कायमची छाप सिनेसृष्टीवर उमटली.

छोट्या पडद्यावर येण्यापूर्वी रंगभूमीवरील त्यांचं सादरीकरण 'अफलातून'च आहे. तर संगीत नाटकातीलही त्यांच्या भूमिकांचे कौतुक करावं लागेल. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे रंगभूमीवर सादरीकरण केले. वि. वा. शिरवाडकरांच्या 'ययाती आणि देवयानी'ची कथेच्या सादराकरणात अशोक सराफ एक प्रतिभावंत कलावंत म्हणून उतरले. ययाती आणि देवयानी नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका साकारली होती.

अशोक सराफ यांनी अडीचशेहून अधिक चित्रपट गाजवले. 'दोन्ही घरचा पाहुणा', 'जवळ ये लाजू नको,' 'तुमचं आमचं जमलं,' 'दिड शहाणे', 'हळदी कुंकू', 'दुनिया करी सलाम', 'पांडू हवालदार', 'कळत नकळत', 'भस्म', 'वजीर', 'चौकट राजा', 'अशी ही बनवा बनवी,' 'गोंधळात गोंधळ,' 'बिन कामाचा नवरा,' 'लपंडाव,' 'एक डाव भुताचा,' 'आम्ही सातपुते' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली. 'नवरी मिळे नवऱ्याला',' आत्मविश्वास', 'गंमत जंमत', 'आयत्या घरात घरोबा'पासून, 'शुभमंगल सावधान', 'आई नंबर वन' व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर' यांसारख्या चित्रपटांसून वेगळ्या भूमिका साकारून त्यांनी हम भी किसीसे कम नहीं हे दाखवून दिले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT