Latest

ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू! उद्याच्या बहुमत चाचणीला आव्हान देण्याची ‘मविआ’ची तयारी

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; उद्या गुरूवार ३० जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा उद्याच होणार आहे. राज्यपालांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. विशेष अधिवेशन उद्या (दि.३०) सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान होईल. सभागृहाच्या कामकाजाचे लाइव्ह टेलिकास्ट केले जावे, असेही निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

सरकार अल्पमतात असल्याचे पत्र आपल्याला सात अपक्षांसह भाजपचेदेखील मिळाले आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलवून सरकारची बहुमत चाचणी घ्या. ही चाचणी गुप्त नाहीतर हात वर करून घेण्यात यावी. यावेळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला असून आजच महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

दरम्यान, गुवाहाटी येथे असलेले बंडखोर आमदार हे आजच गोव्यात दाखल होणार आहेत. ते उद्या सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. भाजपचे आमदारही रात्रीपर्यंत मुंबईत येणार असून भाजप आमदारांची बैठक घेऊन रणनिती आखणार आहेत.

अल्पमतात आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, अशी मागणी करणारे पत्र भारतीय जनता पक्षाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले होते. परिणामी, गेला आठवडाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याचा क्लायमॅक्स आता समीप आला आहे. शिवसेनेेतील बंडानंतर सुरू झालेल्या राजकीय नाट्यात नवव्या दिवशी भाजपने एन्ट्री घेतली आणि सरकारला शक्‍तिपरीक्षेचे आव्हान देण्यासाठी राजभवन गाठले होते. आता विधिमंडळ प्रशासनाने शक्‍तिपरीक्षेची तयारीदेखील सुरू केली आहे.
महाविकास आघाडीच्या शक्‍तीपरीक्षा कशी होणार याबद्दल अटकळी बांधल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार गैरहजर राहिल्यास बहुमताचा आकडा १४५ ऐवजी १२५ वर येऊ शकतो.

अशा परिस्थितीत भाजप आणि भाजप समर्थक मिळून ११३ सदस्य होतात. बविआचे ३, शेकापचा १, अपक्ष १० आणि इतर २ असे १२९ सदस्यांचे पाठबळ भाजपकडे जमा झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT