Latest

लखनौचा मार्क वूड आयपीएल उत्तरार्धातून बाहेर

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लखनौ सुपर जायंटस्चा आघाडीचा जलदगती गोलंदाज मार्क वूड पुढील महिन्यात अपत्याच्या स्वागतासाठी मायदेशी परतणार असून, यामुळे तो आयपीएलच्या उत्तरार्धात उपलब्ध असणार नाही. मार्क वूडने या हंगामात लखनौतर्फे आतापर्यंत 4 सामने खेळले असून, त्यात 8.12 च्या सरासरीने 11 बळी घेतले आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो लखनौतर्फे शेवटच्या दोन सामन्यांत खेळू शकलेला नाही.

वूड व त्याची पत्नी साराह यांना मे महिन्याच्या उत्तरार्धात दुसरे अपत्य अपेक्षित आहे. मे महिन्यातील तिसर्‍या आठवड्याच्या आसपास मार्क वूड मायदेशी रवाना होईल, असे संकेत आहेत. यंदा आयपीएलचे क्वॉलिफायर्स दि. 23 व 26 मे रोजी खेळवले जाणार असून, स्पर्धेची निर्णायक फायनल दि. 28 मे रोजी खेळवली जाणार आहे.

मार्क वूडप्रमाणेच इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनेदेखील आपण आयपीएलच्या उत्तरार्धात उपलब्ध असणार नाही, असे यापूर्वी जाहीर केले आहे. इंग्लंडचा संघ आयर्लंडविरुद्ध दि. 1 जूनपासून एकमेव कसोटी खेळणार असून, यामुळे कसोटी संघात समाविष्ट असलेल्या अनेक इंग्लिश क्रिकेटपटूंना आपल्या राष्ट्रीय संघात रूजू व्हावे लागणार आहे. अर्थात, ईसीबीने आपण आपल्या खेळाडूंवर सक्ती करत नाही, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT