Latest

अत्याचारानंतर तरुणीची अश्लील छायाचित्रे काढली, केसही कापले; मीरारोडमध्ये लव्ह जिहाद

मोहन कारंडे

मिरारोड : पुढारी वृत्तसेवा : मीरा रोडमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिला मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिची अश्लील छायाचित्रे काढून तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले होते. तसेच तिचे केस काढून तिला विद्रुप करण्यात आले होते. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
मिरारोड येथे राहणारी २६ वर्षांची पीडित तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेते. तिचे कुटुंबिय उच्चशिक्षीत आहे. तिने नयानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये गणपती आगमनाच्या वेळी सोसायटीमध्ये सार्वजनिक गणपती मंडळाने कल्याण येथून ढोलताशा पथक बोलावले होते. त्या पथकातील मोहसीन शेख याच्याशी तिची ओळख झाली. या ओळखीतून पुढे मैत्री झाली. त्यानंतर मोहसीनने तरुणीच्या इंस्टाग्रामवर प्रेम करत असल्याचे मेसेज पाठवले. त्यावेळी तिने आपली फक्त मैत्री असल्याचे सांगितले.
ऑक्टोबर महिन्यात तरुणीचे आई व भाऊ हे बाहेरगावी गेले होते. हे समजताच मोहसीन तिच्या घरी बिर्याणी घेऊन आला. त्यात गुंगीचे औषध मिसळले होते. बिर्याणी खाताच ती बेशुद्ध झाल्यानंतर मोहसीनने शारीरिक अत्याचार करुन तिची अश्लील छायाचित्रे काढली. यानंतर ही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्याशी वारंवार बळजबरी करायचा. यानंतर तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची सक्ती करू लागला. तिने नकार दिल्यावर मारहाण करू लागला. तिचे केस कापून विद्रुप केले गेले. तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून रोकड सोन्याचे दागिने उकळण्यात आले, तसेच मुंबईतील दोन दर्गामध्ये नेत बुरखा घालण्याची सक्ती केली, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
मोहसीनचे भाऊ जाफर, मोबिन, मेव्हणा अश्फाक शेख यांनी तिचा विनयभंग केला. काका इम्रान बागवान याने तिला मारहाण केली. मोहसीनची आई शहनाजही तिला धर्म बदलण्याची सक्ती करायची, असेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात फसवणूक, बलात्कार, विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT