Latest

वजन कमी होत नसेल तर केमिकल लोचा!

Arun Patil

ब्रिस्बेन : वजन आटोक्याच्या पलीकडे जाणे कोणालाच रुचणार नाही. अशा वेळी काही जण खाण्यापिण्यावर प्रचंड मर्यादा आणतात, तर काही जण याबरोबरच जिममध्ये व्यायाम, कसरती सुरू करतात. काही जण फक्त फलाहार सुरू करतात. ऑस्ट्रेलियातील एका 17 वर्षीय युवतीने असाच फंडा सुरू केला. पण यानंतरही काहीच फरक पडत नसल्याने तिने डॉक्टरांशी संपर्क साधला, त्या वेळी त्यांनी याचे सांगितलेले कारण निव्वळ थक्क करणारे होते.

अ‍ॅली बॅकस्टर असे तिचे नाव असून, एकवेळ तिचे वजन चक्क 142 किलोंपर्यंत पोहोचले होते. वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच आपले वजन अन्य मुलींच्या तुलनेत बरेच वाढत असल्याचे तिला जाणवत होते. एकवेळ तर तिचे वजन इतके वाढले की, तिला चालणेही दुरापास्त होऊ लागले. 10 ते 20 वर्षांची असताना तिला याचमुळे अनेकदा शस्त्रक्रियाही करवून घ्यावी लागली. फॅटी लिव्हर हे याचे मुख्य कारण असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. शस्त्रक्रियेनंतरही वजन जैसे थे होऊ लागल्याने अधिक चाचण्या केल्या गेल्या आणि हा फंक्शनल न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर असल्याचे अधोरेखित झाले. या आजारात शरीरावरील चरबीची माहिती पुढे पोहचतच नाही आणि अशा परिस्थितीत डायटिंगसारखे सारे प्रयत्न शून्य होतात.

यादरम्यान, तिला गॅस्ट्रीक स्लीव्ह सर्जरीबद्दल माहिती मिळाली आणि निष्णात डॉक्टरही शोधण्यात आले. या शस्त्रक्रियेपूर्वी दोन आठवडे तिला वेगवेगळी पथ्ये देण्यात आली आणि ती तिने काटेकोरपणे अमलात आणली. यादरम्यान तिचे वजन 7 किलोंनी कमी झाले आणि शस्त्रक्रियेनंतर 9 महिन्यांत आणखी 65 किलो वजन कमी करण्यात तिला यश आले. आता तिची वाढही सर्वसामान्यांप्रमाणे आहे. हा केमिकल लोचा किती त्रासदायक असू शकतो, याबद्दल ती आता इंटरनेटवर मार्गदर्शन करत असते.

SCROLL FOR NEXT