Latest

रहस्‍यरंजन : ऐरावतेश्वराच्या पायर्‍यांमधून उमटणारे संगीत

Arun Patil

ऐरावतेश्वर मंदिराची वास्तुकला इतकी रहस्यमय आहे की, जो कुणी पाहील तो अचंबित राहतो. हे मंदिर भगवान शिवाचे आहे. ह्या मंदिराच्या पायर्‍या रचनेने अद्भुत तर आहेतच; शिवाय या पायर्‍यांमधून येणारा गूढ संगीताचा ध्वनी त्याहून कमालीचा आहे.

तामिळनाडूतील कुंभकोणमजवळ दारासुरम येथे एक विश्वविख्यात मंदिर आहे. त्याचं नाव आहे ऐरावतेश्वर! द्रविड वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आणि चोल साम्राज्यातील 'द ग्रेट लिविंग टेंपल्स'पैकी एक ऐरावतेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर असले, तरी शिवाबरोबरच शक्ती आणि वैष्णवांच्या परंपरेविषयी देखील श्रद्धा बाळगली जाते.

असे म्हटले जाते की, हे मंदिर 12 व्या शतकात दुसरा चोल राजा याने बांधले होते. हे मंदिर त्या महापराक्रमी राजाचं जितंजागतं स्मारक आहे. चोल राजानं खूप पराक्रम केला आणि अनेक मंदिरे उभी केली. युनेस्कोकडून हे मंदिर 2004 मध्ये जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आलं आहे. मंदिराच्या आत भव्य शिवलिंग आहे, तोच ऐरावतेश्वर! असे म्हटले जाते की, ऐरावत नावाच्या ऋषींना दुर्वास ऋषींनी शाप दिला. त्या शापाच्या प्रभावानं ऐरावत ऋषींचा रंग बदलला. त्यामुळं ते मनातून खूप दु:खी होते. त्यांनी या आपल्या शापाला उःशाप मिळावा म्हणून मंदिराच्या तलावातील पवित्र जलामध्ये स्नान केले. ते शिवाच्या कृपेने शापमुक्त झाले. त्यानंतर त्यांचा रंग पूर्ववत झाला. ऐरावतेश्वर या नावाविषयी आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. मंदिराच्या आतील बाजूस एका दालनात एक भव्य प्रतिमा आहे. ज्यात इंद्र बसले आहेत. देवांचा राजा इंद्र याचा शुभ्र हत्ती म्हणजे ऐरावत. या ऐरावतानं मनोभावे भोलेनाथाची पूजा करून जलाशयात स्नान केले, त्यानंतर त्याला शुभ्र त्वचा लाभली, अशीही आख्यायिका आहे. शिवशंकराच्या आशीर्वादाने त्या ऐरावताचं नाव या तीर्थक्षेत्राला आणि त्या शिवलिंगालाही प्राप्त झालं. यामुळे हे मंदिर ऐरावतेश्वर नावाने ओळखले जाते. साक्षात मृत्यूचा देव यम याला एका ऋषींनी शाप दिला, त्यामुळं त्याच्या सार्‍या शरीराची लाही लाही व्हायला लागली. त्यापासून मुक्त होण्यासाठी शिवशंकराचे वरदान प्राप्त करणे आवश्यक होते. म्हणून यमाने या मंदिरात शिवशंकराची पूजा केली आणि जलाशयात स्नान केले. त्यानंतर यमाच्या अंगाची लाही लाही थांबली. तेव्हापासून या जलाशयाला यमतीर्थम् असेही म्हणतात, असे पुराणकथांनी सांगतले आहे.

मंदिराची वास्तुकला अप्रतिम आहे. मंदिराची नक्षी भाविकांचे मन मोहून घेते. त्या नक्षीला कारकोईल असं म्हणतात. खास करून येथील पायर्‍या. असे म्हटले जाते की, या पायर्‍या इतक्या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यात आल्या आहेत की, पायाचा थोडासा दाब दिला की, या पायर्‍यांंमधून संगीताचे विविध ध्वनी ऐकू येतात. त्यांना गाणार्‍या पायर्‍या असंही म्हटलं जातं. तसेच सात आकाशीय देवींच्या मूर्तीदेखील येथे द़ृष्टीस पडतात. खासकरून येथे तीन पायर्‍या अशा प्रकारे बनवण्यात आल्या आहते की, त्या पायर्‍यांवर दाब देऊन नव्हे, तर गतीने पाय टाकल्यानंतरही संगीताचे ध्वनी प्रतीत होतात. त्याशिवाय मंदिराच्या अंगणात दक्षिण-पश्चिम दिशेत चार तीर्थे आणि एक मंडप आहे. त्यावर यमाची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे.

द्रविड वास्तुशैलीत दगडांमध्ये घडवण्यात आलेल्या या मंदिरात विलक्षण सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराची उंची 90 फूट आहे. मुख्य मंदिरासमोर मंडपाचा एक भाग दगडाच्या विशाल चाकाच्या एका रथासमान आहे. हा रथ घोडे ओढताना दिसते. ऐरावतेश्वर मंदिर चोल साम्राज्याचे दुसरे 'लिव्हिंग टेंपल्स' बृहदीश्वर आणि गंगईकोंडचोलीश्वरमपेक्षा उंचीने लहान आहे. पण ऐरावतेश्वरचा विस्तार मोठा आहे. त्याची रचना आणि आकर्षण समजणे अगम्य आहे. स्थानिक भाविकांच्या म्हणण्यानुसार, मंदिरात भाविकांना विलक्षण आणि अनोखी अशी प्रगाढ शांतता मिळते.

पायर्‍यांमधून उमटणार्‍या स्वर्गीय सुरांचा शोध घेण्यासाठी अनेक संशोधक येथे येतात. हे स्वर वाद्यामधून उमटावेत असे तंतोतंत येतात. बरेच संशोधन करूनही या ध्वनीचे रहस्य उलगडू शकलेले नाही. ऐरावतेश्वर मंदिर 800 वर्षे इतके प्राचीन आहे. मंदिराचे हे रहस्य पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक येथे येतात.

या मंदिराचे खांब 80 फूट उंच आहेत. दगडा-दगडांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. या मंदिराचे दोन भाग आहेत. पहिला भाग एक दगडी रथाचा आहे. दुसरा भाग यज्ञासाठी बांधण्यात आला होता, म्हणून त्याला 'बलिपीठ' असेही म्हटले जाते.

मंदिराच्या आतील बाजूस कोरीव नक्षीदार इमारतींचा समूह आहे. भगवान शिवाव्यतिरिक्त मंदिरात पेरिया नायकी अम्मान, श्री गणेशाची मंदिरे देखील आहेत. मंदिराच्या प्रांगणात दक्षिण-पश्चिम कोपर्‍यात चार देवस्थानांसह एक मंडप आहे. मंदिरातच एक मोठा पाषाण असून तेथे सप्तमातांच्या मूर्तीही आहेत.

मंदिरात अनेक शिलालेख आहेत. एका लेखात कुलोतुंगा चोल तृतीयद्वारा मंदिराचे नूतनीकरण केल्याची माहिती मिळते. मंदिराच्या गोपुरमजवळ आणखी एक शिलालेख आहे. येथील प्रतिमा कल्याणी येथून आणल्याचे सांगितले जाते. ज्याचे नाव राजाधिराज चोल प्रथम याने 'कल्याणपूर' असे ठेवले होते, असा संदर्भ मिळतो. आधी एक विभाग वेगळा करण्यात आला असावा आणि नंतर या खडकाच्या आत आणि बाहेरून मंदिर कोरण्यात आले असावे.

मंदिराच्या आत आणि बाहेर सर्व बाजूंनी शिल्पे आणि सजावटीने हे परिपूर्ण आहे. या मंदिराच्या प्रांगणाच्या तीन बाजूंना गाभार्‍याच्या रांगा आहेत. त्या मंदिराच्या वरच्या भागाला एका पुलाने जोडलेल्या होत्या. आता हा पूल पडलेला दिसतो. समोरील मोकळ्या मंडपात नंदीची मूर्ती विराजमान आहे. त्याच्या दोन्ही बाजूला मोठे हत्ती व खांब उभे असलेले दिसतात. हे काम भारतीय वास्तुविशारदांच्या कौशल्याचे अप्रतिम उदाहरण म्हणता येईल.

SCROLL FOR NEXT