Latest

Lok Sabha Election 2024 : ‘तुम्हाला राजकारणात मुले होत नाहीत म्हणून आमचे…’; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोणाच्याही खासगी आयुष्यात जाऊन डोकावण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकार करत आहे. कोणी काय करावे, कोणाला किती मुले आहेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला राजकारणामध्ये मुले होत नाहीत म्हणून आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावे लागत आहेत. ही आमची काही पोरं तुम्ही चोरली, मुलं पळवणारी तुम्ही टोळी आहात. तुम्ही चाळीस चोरले असाल, शरद पवार यांचे काही चोरले असाल; पण महाराष्ट्रातील कोट्यवधी लोक हे महाविकास आघाडी सोबत खांद्याला खांदा लावून तुमचा सुफडासाफ करण्यासाठी उभे आहेत, असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानामध्ये शिव-शाहू निर्धार सभा आयोजित केली होती. या सभेत ते बोलत होते. गेल्या लोकसभेत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला; पण भाजपने विधानसभेत शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडले, आता मी तुम्हाला सोडणार नाही, ज्यांनी माझ्या शिवसैनिकांशी, भगव्याशी गद्दारी केली त्यांचा मी लोकसभा निवडणुकीत सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

ठाकरे म्हणाले, जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आलो आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील त्यांची निशाणी हात, तुतारी घेतलेला मावळा आणि मशाल आहे. या आपल्या हक्काच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवा आणि हुकूमशहाचे सरकार गाडून टाका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. शिवाजी महाराज, शाह, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र टिकवणार का मोदी-शहा यांच्या हातात देणार, असा सवाल करत ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. आता दोन सुरतवाले महाराष्ट्र लुटत आहेत. अशावेळी आम्ही डोळ्यांवर झापडे लावून बघत बसणार काय, त्यांना महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपले म्हणजे महाराष्ट्र आपला झाला, असे वाटत होते; पण तसे झाले नाही. उलट नव्या जोमाने आम्ही उभे आहोत. शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांच्या वाटेला जाऊ नका, महाराष्ट्र सहन करणार नाही, जो महाराष्ट्राच्या मुळावर आलेला आहे त्याचा सुफडासाफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.

गायीवर बोलता, महागाईवर का बोलत नाही?

केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत दिलेले कोणतेही आश्वासन पाळले नाही. पंधरा लाख रुपये कोणाच्या खात्यात आले का? नोकरी नाही, घरे नाहीत, गॅसचे दर वाढले, जीएसटीच्या माध्यमातून लोकांचा खिसा रिकामा करण्याचे काम या सरकारने केले. बाकी विषयावर चर्चा करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी २०१४८ साली काय आश्वासन दिले यावर बोलावे. तशी समोरासमोर चर्चा करण्याची माझी तयारी आहे; पण तुम्ही केवळ गायीवर बोलता, महागाईवर कधी बोलणार, असा सवाल ठाकरे यांनी केला. सगळे वाईड बॉल आणि नो बॉल टाकण्यापेक्षा, स्टंपवर बॉल टाका; आमची तयारी आहे; पण पंच मात्र निष्पक्ष असला पाहिजे. तुमच्यासारखा नको; कारण आरोपी तुम्हीच करायचे, शिक्षाही तुम्हीच ठरवणे योग्य नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

… तर संभाजीराजे यांची जाहीर माफी मागतो

राज्यसभेच्या निवडणुकीत संजय पवार पडले, हा संदर्भ घेऊन दगाफटका कोणी केला माहीत आहे, त्यावेळी संभाजीराजे यांच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो आम्हा दोघांना माहीत आहे; पण याचा अर्थी आमची मैत्री तुटली, असा होत नाही. त्यांच्याबद्दल मी काही चुकीचा निर्णय घेतला असेल, तर या सभेत जाहीर माफी मागतो, असे सांगून ठाकरे यांनी मी चुकलो असेन; पण तुम्ही चुकू नका, असे सांगून शाहू महाराज यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

मुश्रीफ विसरले

कागलमध्ये मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे पडले, तेव्हा त्यांच्या पत्नी या तळमळीने सांगत होत्या की, असे चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावून आम्हाला बदनाम करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला; पण मुश्रीफ हे सर्व विसरले. भाजपने शरद पवार यांचे पक्षाचे चिन्ह असणारे घड्याळ चोरले, शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला. रस्त्यावरची पाकीट मारी करत असल्याप्रमाणे पक्ष चोर म्हणून तुमचाकडे पाहिले जाते, असा घणाघातही भाजपचे नाव न घेता ठाकरे यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT