नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पंजाब राज्यासाठी स्टार प्रचारकांची घोषणा केली. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह तुरुंगात असलेले आपचे नेते मनिष सिसोदिया, अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनिता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान अशी प्रमुख नेत्यांची नावे आहेत मात्र आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांचे नाव या यादीत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात १ जूनला पंजाबमध्ये सर्व १३ जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना खिंड लढवणाऱ्या त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह, संदीप पाठक, राघव चड्ढा, पंकज गुप्ता, एन. डी. गुप्त, दिल्लीतील मंत्री गोपाल राय, अतिशी, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत या प्रमुख नेत्यांसह ४० नावे आहेत.
दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांचे नाव या यादीमध्ये नाही. सोमवारी सकाळी स्वाती मालिवाल यांना अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सहाय्यकाने मारहाण केल्याचा आरोप झाला. त्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याच्या काही कालावधीनंतरच ही यादी जाहीर झाली आणि या यादीत स्वाती मालिवाल यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. स्वाती मालिवाल केजरीवाल यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. त्या केजरीवालांच्या सल्लागारही होत्या.