Latest

Lok Sabha Elections 2024 first phase : महाराष्‍ट्रातील पाच तर देशातील १०२ मतदारसंघात आज मतदान, जाणून घ्‍या प्रमुख लढती

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज (दि.१९) देशातील २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १०२ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यामध्‍ये महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील ५ मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदानातून ८ केंद्रीय मंत्री, २ माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य "ईव्हीएम" मशीनमध्ये बंद होणार आहे. ( Lok Sabha Elections 2024 first phase )

विदर्भातील पाच मतदारसंघात आज मतदान

राज्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली मतदारसंघात आज मतदान होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवित आहेत. गडकरी यांची लढत काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्याशी आहे. या लढतीकडे देशासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नितीन गडकरी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २ लाख १६ हजार इतक्या मतांनी पराभव केला होता. गडकरी यांना ६ लाख ६० हजार २१० तर पटोले यांना ४ लाख ४४ हजार २१२ मते मिळाली होती. २०१४ मध्ये गडकरी यांनी ७ वेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा तब्बल ३ लाख २ हजार ९१९ मतांनी पराभव केला होता. गडकरी यांना तेव्हा ५ लाख ८७ हजार ७६७ मते तर मुद्देवार यांना २ लाख ८४ हजार ८४८ मते मिळाली होती. गडकरी नागपूरमधून तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. ( Lok Sabha Elections 2024 first phase )

रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांची लढत काँग्रेसचे श्याम बर्वे यांच्याशी आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे सुनील मेढे यांची काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्याशी लढत आहे. चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार व राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्यापुढे जबरदस्त आव्हान उभे केले आहे. चिमूर-गडचिरोली मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. अशोक नेते यांची काँग्रेसचे नामदेव किरपान यांच्याशी टक्कर आहे. ( Lok Sabha Elections 2024 first phase )

अरुणाचल प्रदेशात किरण रिजीजू विरुद्ध नबाम तुकी लढत

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम अरुणाचल मतदारसंघात केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांची लढत माजी मुख्यमंत्री व अरुणाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नबाम तुकी यांच्याशी होत आहे.

दिब्रूगडमध्ये केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल रिंगणात

आसामच्या दिब्रुगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय बंदरे व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. भाजपने विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांचे तिकीट कापून सोनोवाल यांना मैदानात उतरवले आहे.

मुजफ्फरनगरमध्ये संजीव बलियान यांची तिहेरी लढत

उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री संजीव बलियान यांचा सामना समाजवादी पक्षाचे हरेंद्र मलिक आणि बसपाचे उमेदवार दारासिंह प्रजापती यांच्याशी होत आहे.

उधमपूरमध्ये जितेंद्रसिंह विरुद्ध चौधरी लालसिंह

जम्मू काश्मीरच्या उधमपूर मतदारसंघात दोन वेळा खासदार राहिलेले केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्रसिंह तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. जितेंद्रसिंह यांची लढत काँग्रेसचे उमेदवार  लालसिंह चौधरी यांच्याशी आहे.

राजस्थानात दोन केंद्रीयमंत्री रिंगणात

राजस्थानच्या अलवर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव निवडणूक लढवत आहेत. बिकानेर मतदारसंघात केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघावाल यांची लढत काँग्रेसचे माजी मंत्री गोविंदराम मेघावाल यांच्याशी होत आहे.

निलगिरीत ए. राजा यांचा मुरुगन यांच्याशी सामना

तामिळनाडूच्या निलगिरी लोकसभा मतदारसंघात द्रमूकचे खासदार व माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांची भाजपचे उमेदवार केंद्रीय मत्स्य राज्यमंत्री के. एल. मुरुगन यांच्याशी लढत होत आहे. मुरुगण हे सध्या मध्यप्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत. भाजपने त्यांना प्रथमच उमेदवारी दिली आहे.

शिवगंगामध्ये कार्ती चिदंबरम दुसऱ्यांदा रिंगणात

तामिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम पुन्हा रिंगणात उतरले आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात के. टी. देवनाथन यादव यांना उमेदवारी दिली आहे. अण्णाद्रमूकचे नेते झेवियर दास हे सुद्धा रिंगणात आहेत. पी. चिदंबरम या मतदारसंघातून तब्बल ७ वेळा खासदार राहिले आहेत.

कोईमतूरमध्ये अन्नामलाई विरुद्ध गणपती पी. राजकुमार

भाजपाचे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष के. अन्नामलाई कोईमतूर मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. त्यांची लढत द्रमूकचे नेते गणपती पी. राजकुमार आणि अण्णाद्रमुक पक्षाचे उमेदवार के. सिंगाई रामचंद्रन यांच्याशी आहे.

सौंदरराजन चेन्नई – दक्षिणमधून रिंगणात

तेलंगणाच्या राज्यपाल आणि पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा नुकताच राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात प्रवेश करणाऱ्या तमिलीसाई सौंदरराजन चेन्नई दक्षिण मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. सौंदरराजन या २०१९ मध्ये तूतूकोडी मतदारसंघातून उमेदवार होत्या. द्रमूक नेत्या कनीमोई यांच्याविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

नकुलनाथ यांचेही भवितव्य मशीनबंद होणार

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सुपुत्र नकुलनाथ हे छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नशिब आजमावत आहेत. कमलनाथ यांनी या जागेवर १९८० पासून तब्बल नऊ वेळा विजय मिळविला होता. २०१९ मध्ये भाजपने २९ पैकी २८ जागा जिंकल्या होत्या. मात्र, छिंदवाडामध्ये भाजपला विजय मिळवता आला नाही. २०१९ मध्ये नकुलनाथ विजयी झाले होते.

पश्चिम त्रिपुरामध्ये माजी मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशिषकुमार साहा यांच्यात लढत रंगणार आहे.
मणिपूरचे कायदा व शिक्षण मंत्री आणि भाजपचे उमेदवार वसंतकुमार सिंह रिंगणात आहेत. त्यांची लढत जेएनयुचे प्राध्यापक व काँग्रेस उमेदवार विमल अकोई जाम यांच्याशी आहे.

चुरूमध्ये झाझरियाविरुद्ध राहुल कस्वा लढत

भाजपचा गड मानला जाणाऱ्या राजस्थानच्या चुरू लोकसभा मतदारसंघात पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भालाफेक खेळाडू भाजपचे देवेंद्र झाझरिया यांची लढत काँग्रेसचे राहुल कस्वा यांच्याशी आहे. भाजपने कस्वा यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेश घेतला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT