Latest

वेध लोकसभेचे-अंकुशराव टोपे, गुंडेवार यांचा लोकसभेत प्रवेश

स्वालिया न. शिकलगार

१९९१ ची निवडणूक राष्ट्रीय स्तरावर गाजली ती विविध मुदनी. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडविल्यामुळे भाजपने व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. परिणामी, सिंह सरकार कोसळले आणि चंद्रशेखर पंतप्रधान झाले. राजीव गांधी यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने मध्यावधी निवडणुका घोषित झाल्या. मंडल आयोग, सोने गहाण ठेवण्याचा प्रसंग, हिंदुत्वाचा प्रचार आणि ऐन निवडणूक प्रचारात २१ मे रोजी झालेली राजीव गांधी यांची हत्या या पार्श्वभूमीवर निवडणूक पार पडली.

मराठवाड्यातून निवडून आलेल्यांमध्ये मोरेश्‍वर सावे, केशरकाकू क्षीरसागर, शिवराज पाटील चाकूरकर, अरविंद कांबळे, प्रा. अशोक देशमुख हे खासदार असे होते की, त्यांना लोकसभेचा अनुभव होता. हिंगोलीचे विलास गुंडेवार, नांदेडच्या सूर्यकांता पाटील, जालन्याचे अंकुशराव टोपे हे प्रथमच लोकसभेत विजयी झाले. त्यातही सूर्यकांता यांना राज्यसभेचा अनुभव होता. टोपे यांना आमदारकीचा अनुभव होता. सांसदीय कामकाजाचा विचार करता गुंडेवार हे नवखे होते.

१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत विलासराव गुंडेवार यांना भाजपने उमेदवारी दिली होती. परंतु काँग्रेसचे उत्तमराव राठोड यांनी त्यांना ७१ हजार मतांनी पराभूत करीत हॅट्ट्रिक साधली. १९९१ ला मात्र या पराभवाचा वचपा गुंडेवार यांनी काढला. त्यावेळी झालेल्या वाटाघाटीत भाजपकडून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. गुंडेवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढविली आणि राठोड यांचा ३ हजार ७९३ मतांनी पराभव केला. जनता दलाचे डी. बी. पवार उभे राहिल्याने राठोड यांना मिळणार्‍या मतांचे प्रमाण घटले व त्याचा फायदा गुंडेवार यांना झाला. अर्थात पुढे गुंडेवार यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांच्यावरील अविश्‍वास दर्शक ठरावाच्या वेळी पक्षादेश झुगारून राव यांच्या बाजुने मतदान केले व पुढे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९६ ला काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, परंतु ते तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले.

अंकुशराव टोपेंची बाजी

जालना मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर अंकुशराव टोपे विजयी झाले. त्यांनी भाजप उमेदवार पुंडलिक हरी दानवे यांचा ६८ हजार मतांनी पराभव केला. त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राजीव गांधी, नजमा हेपतुल्‍ला आले होते. टोपे यांचे सहकार क्षेत्रात चांगले नाव होते. अंकुशनगर येथे समर्थ सहकारी साखर कारखाना स्थापन करीत त्यांनी या भागातील शेतकर्‍यांना न्याय दिला होता. अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील रहिवासी असणार्‍या अंकुशरावांचे शिक्षण जालना, संभाजीनगर येथे झाले. संभाजीनगरातून कायद्याची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली.

राजकारणात उतरून समाजकार्य करण्याची इच्छा होती. १९७२ ला ते काँग्रेसकडून अंबड विधानसभेतून विजयी झाले. त्यावेळी दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या होत्या. आपल्या मतदारसंघात रोहयोची कामे प्राधान्याने सुरू करण्यासाठी त्यांनी एसटीने प्रवास केला. सव्वा लाख लोक रोहयोवर कामाला लावले. त्यामुळे प्रभावित होवून तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांना लंडन येथे कॉमनवेल्थ परिषदेसाठी पाठविले होते. मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे जाळे त्यांनी तालुकाभर पसरविले. त्यातून जवळपास पन्नास शाळा, महाविद्यालये उभी आहेत.

काँग्रेस व पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असे काम पाहणार्‍या टोपे यांनी महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन, राज्य सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनवर काम केले. समर्थ आणि सागर हे दोन सहकारी साखर कारखाने, जिनिंग मील, समर्थ सहकारी दूध संघ, जालना जिल्हा बँक आदी विविध संस्थात त्यांनी प्रभावीपणे काम केले. यशवंतराव चव्हाण साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्य, संस्कृतीशी त्यांचे नाते जुळले. याशिवाय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून गरीब कुटुंबाचे विवाह त्यांनी लावले.

SCROLL FOR NEXT