Latest

मोदी यांच्या करिष्म्यामुळे आघाड्यांचे युग संपुष्टात

दिनेश चोरगे

देशात 2014 मध्ये पार पडलेली सार्वत्रिक निवडणूक भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. त्याचे शिल्पकार ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्या करिष्मादायी नेतृत्वामुळे भाजपने लागोपाठ दोनदा केंद्रात बहुमत मिळवले. यावेळी तर मोदींच्या विजयाची हॅट्ट्रिक निश्चित मानली जात आहे.

संपूर्ण देशात सध्या निवडणूक प्रचाराचे वातावरण असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी हॅट्ट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. बहुतांश राजकीय विश्लेषकांसह अलीकडील जनमत चाचण्यांनुसार मोदी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे येत्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा सलग तिसरा विजय निश्चित मानला जात आहे. 2014 मधील सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वसंध्येला राजकीय पंडितांनी अशी भविष्यवाणी केली होती, की यावेळी कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही. मोदी यांनी तो अंदाज खोटा ठरविला. त्याचबरोबर आघाडीच्या राजकारणाला त्यांनी हद्दपार करून टाकले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपला तेव्हा स्वबळावर 282 जागा मिळाल्या. भारतीय राजकारणातील ही घटना वैशिष्ट्यपूर्ण ठरली. त्यानंतर 2019 मध्ये म्हणजेच गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर 303 जागांना गवसणी घालून आपल्या कामगिरीत अफलातून सुधारणा केली. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुका जिंकून भाजपने इतिहास घडविला. यात मोदी यांच्या जादूई नेतृत्वाचा सिंहाचा वाटा होता. यामुळे जागतिक पातळीवरही मोदी यांचा बोलबाला झाला आणि अजूनही त्यांच्या विस्मयकारक नेतृत्वाची जगभर चर्चा होताना दिसते.

काँग्रेसची वाताहत

भाजपचा आलेख झेपावत असताना काँग्रेसची झपाट्याने पीछेहाट होत गेली. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले. त्यावेळी राजीव गांधी यांना सहानुभूतीच्या लाटेचा मोठा लाभ मिळाला होता. या पार्श्वभूमीवर, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा सफाया झाला. लोकसभेत या पक्षाला लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. 2019 च्या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने मोहीम राबवली; मात्र त्याचा कसलाही फायदा त्या पक्षाला झाला नाही. दिवसेंदिवस काँग्रेसचा र्‍हास होत चालला असून, त्याचे जुने वैभव संपुष्टात आले आहे. याच्या उलट, चौफेर आर्थिक विकास आणि सुशासन हा मोदी यांनी राबविलेला अजेंडा मतदारांना मनापासून आवडला. त्याचेच प्रतिबिंब 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांत ठळकपणे पडल्याचे दिसून येते. दुसरे म्हणजे तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमधील बेदिली आणि घोटाळे यामुळे काँग्रेसच्या पतनाची प्रक्रिया सुरू झाली. त्याचाही लाभ भाजपला झाला.

मोदी यांच्या धडाकेबाज मोहिमा

दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवाद, देशाची सुरक्षा आणि विकास यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या धडाकेबाज मोहिमांमुळे विरोधी पक्ष निस्तेज होत गेले. मोदी सरकारची लोकाभिमुख धोरणे आणि कार्यक्रमांनी मतदारांच्या मनावर खोलवर प्रभाव पाडला. त्याचबरोबर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि अद्रमुक या प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यात तडफेने निवडणूक लढवली, हेही नाकारून चालणार नाही. भाजपच्या हायटेक प्रचारात देशभरातील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी आधुनिक सामग्रीचा वापर करण्यात आला.

रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून भाजपने जनतेला हे पटवून दिले की, कल्याणकारी योजना राबविण्यात आमचा हात कोणीही धरू शकत नाही. त्यासाठी विविध प्रदेशांतील लोकांपर्यंत हे मुद्दे पोहोचण्याकरिता मोदी यांनी आपले प्रत्येक भाषण काळजीपूर्वक केल्याचे दिसून येते. जोडीला भाजपने सोशल मीडियाचा अन्य सर्व पक्षांच्या तुलनेत प्रभावीरीत्या वापर करून तरुण मतदारांशी संपर्क साधला. काँग्रेसला वेगाने मागे टाकून भाजपने दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांत प्रचारातही आघाडी घेतल्याचे दिसून आले. काँग्रेसचा प्रचार विस्कळीत होता. त्यांच्याकडे जनतेला देण्यासाठी कोणताही ठोस आणि मुख्य म्हणजे पर्यायी कार्यक्रम नव्हता. भाजपच्या वेगवान प्रचारामुळे काँग्रेस पक्ष सैरभैर झाला. काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व करणारे राहुल गांधी मतदारांशी संवाद साधण्यात अयशस्वी ठरले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.

2014 मधील सार्वत्रिक निवडणूक भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. त्याचे प्रशासनावरही दूरगामी परिणाम झाले. नरेंद्र मोदी सत्तेवर आरूढ झाल्यामुळे देशाला राजकीय स्थैर्य प्राप्त झाले आणि आघाडीचे युग संपले. मोदी यांच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधांचा विकास आणि परकीय गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दिले गेले. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याबरोबरच जागतिक पातळीवर भारताला वैभव मिळवून देण्याला प्राधान्य देण्यात आले. आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मोदी यांनी आर्थिक वाढ, तांत्रिक नवकल्पना आणि सामाजिक विकासाला चालना दिली. त्या उद्देशाने 'मेक इन इंडिया', 'डिजिटल इंडिया' आणि 'स्वच्छ भारत अभियान' यासह अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले. नंतरच्या काळात मोदी सरकारची लोकप्रियता आणखी वाढली आणि विरोधी पक्ष हतबल बनले. एवढेच नव्हे, तर त्यांचे अनेक तालेवार नेते 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांत पराभूत झाल्याचे पाहायला मिळाले. हा सगळा मोदी यांचाच करिष्मा म्हटला पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT