Latest

दोन दिवसांत महायुतीच्या उर्वरित उमेदवारांची घोषणा; सहाही जागा शिवसेेनेच्या कोट्यातील

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ;  लोकसभा निवडणुकांच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरीही अद्याप अर्धा डझन मतदारसंघांत महायुतीकडून उमेदवार घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे या जागांवरील उमेदवारांच्या घोषणेचा कोणता मुहूर्त बघितला आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अर्ज भरण्यासाठी आता अवघे सहा दिवस उरल्याने येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी एकूण 13 जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी इच्छुकांना आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार, 3 मे हा शेवटचा दिवस आहे. तरीही मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पालघर या सहा जागांवर महायुतीत रस्सीखेच संपलेली नाही. त्यामुळे तातडीने अंतिम तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे या सहाही जागा शिवसेनेच्या कोट्यातील आहेत. भाजपसह राष्ट्रवादीकडून जागांवरील दाव्यांमुळे अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील, तसेच त्यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील उमेदवाराचीही घोषणा बाकी आहे. मात्र, आता अर्ज भरण्यासाठी अवघ्या पाच दिवसांचा अवधी उरल्याने येत्या एक दोन दिवसांत अंतिम घोषणेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असल्याचे जाहीर केले असले तरी शिवसेना शिंदे गटाकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. ठाण्याची जागाही शिंदे गटाकडेच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा आग्रह शिंदे गटाने नाकारला. त्यानंतर अखेर स्वतः भुजबळांनीच या जागेवरचा दावा सोडण्याची घोषणा केली. तरीही इथे उमेदवार नक्की होऊ शकला नाही.

मुंबईतील घोडेही अडलेलेच

दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजप आणि शिंदे गटाकडून दोन-दोन नेते इच्छुक आहेत. मिलिंद देवरा, मिलिंद नार्वेकर आणि आता यामिनी जाधव यांच्या नावांची चर्चा आहे, तर भाजपकडून राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे. ही जागा नेमकी कुणाला सोडायची यावर अजून चर्चा सुरू असून पारडे भाजपच्या बाजूने झुकल्याचे समजते. अशीच काही स्थिती पालघरची आहर, तर उत्तर पश्चिम मुंबईत शिंदे गटाचा उमेदवार अंतिम झालेला नाही.

SCROLL FOR NEXT