Latest

‘स्वाभिमानी’ लोकसभा स्वतंत्रपणे लढणार : राजू शेट्टी

दिनेश चोरगे

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या महायुती व काँगेसच्या महाआघाडीकडून मध्यस्थामार्फत लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रस्ताव येत आहे. मात्र, लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाशी युती न करता स्वतंत्रपणे लढेल,अशी माहिती माजी खा. राजू शेट्टी यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली. सुरू असलेल्या राजकीय घडामोडी माझ्या आकलन शक्तीच्या बाहेर असल्याचे ते म्हणाले.

शेट्टी म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाडी-पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, वाळवा (इस्लामपूर), शिराळा या विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांबरोबर बैठका सुरू आहेत. स्वाभिमानीने भाजप, काँग्रेस पक्षाबरोबर न जाता स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. दोन्हीकडून प्रस्ताव येत आहेत. आम्ही कोणाबरोबरच युती करणार नाही. दोन वर्षांपूर्वी जी भूमिका घेतली होती. तीच भूमिका आमची आहे. शेट्टी म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. राजकीय स्थित्यंतरे माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहेत. लोकसभेसाठी सांगलीतून महेश खराडे, बुलढाण्यातून रविकांत तुपकर तसेच माढा, परभणी, कोल्हापूर येथूनही स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार उभे करणार आहे.

साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकणार…

कोल्हापुरातील साखर सहसंचालकाना स्वाभिमानीचे शिष्टमंडळ भेटले आहे. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी
3175 रुपये देण्याचे कबूल केले होते. त्याची अंमलबजावणी करावी. गेल्या वर्षीच्या उसाचे प्रतिटन 50 व100 रुपयांचे प्रस्ताव तातडीने मागवून घ्यावेत यावर शिष्टमंडळाने चर्चा केली आहे. कारखान्यानी थकीत पैसे दिले नाही तर साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

SCROLL FOR NEXT