नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आगामी निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार चार महिन्यांत शहरातील ११ हजार ८०६ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहर पोलिसांनी संशयित गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संशयितांसह विविध गुन्ह्यात सहभागी झालेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांवर मोक्का, तडीपारी, स्थानबद्धता अशा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत. तर टवाळखोरांवर कारवाइॅ करण्यासाठी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव यांनी पोलिस ठाणेनिहाय नियोजन केले आहे. त्यानुसार शहरातील तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत शहरात अकरा हजार ८०६ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांची यादी पोलिस ठाण्यांनी तयार केली आहे. सातत्याने टवाळखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहर पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाई सुरु आहे. टवाळखोरांची तक्रार, माहिती देण्यासाठी नागरिकांनी ९९२३३२३३११ या व्हॉट्सअप हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच टवाळखोरांचे अड्डे, अवैधरित्या जनावरांची वाहतूक, मांस विक्री करणाऱ्यांची माहिती, अवैध धंदे चालकांची माहिती देण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिस ठाणेनिहाय टवाळखोर कारवाई
परिमंडळ एक
पंचवटी – १,३३१
आडगाव – १,६४६
म्हसरुळ – ६७२
भद्रकाली – २८७
सरकारवाडा – १,३२७
गंगापूर – ७४६
मुंबई नाका – ४९८
परिमंडळ दोन
सातपूर – ५१८
अंबड – २,१५३
इंदिरानगर – ८८७
नाशिकरोड – ४२९
देवळाली कॅम्प – ६३३
उपनगर – ६७९