Latest

Lok Sabha election 2024 : हेमंत गोडसेंविराधात फलकबाजी, कोणाची आहे नाराजी?

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीने उमेदवारी न दिल्याने 'ओबीसी' समाज कमालीचा नाराज झाला आहे. ओबीसी समाजाकडून द्वारका, नाशिक रोडसह शहरातील काही भागांत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. 'आता तरी ऊठ ओबीसी जागा हो' या मथळ्याखाली 'आम्ही ओबीसी ७० टक्के आहोत, तरीही तिकीट मिळाले नाही. मतपेटीत आपली ताकद दाखवून द्या', असे आवाहन या होर्डिंग्जद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून मंत्री भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. किंबहुना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच आपल्याला नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे सांगितल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले होते. परंतु नाशिकच्या जागेवरून महायुतीत रंगलेली रस्सीखेच बराच काळ चालल्याने झालेल्या विलंबामुळे भुजबळ यांनी नंतर स्वत:च नाशिकच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही दिवसांनी महायुतीची उमेदवारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील चारही उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भुजबळ हे राज्य नव्हे तर देशपातळीवरील ओबीसी समाजाचे नेते आहेत. त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी डावलण्यात आल्याने ओबीसी समाज नाराज झाला आहे. ओबीसी समाजाकडून सोशल मीडियावर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमध्ये ही नाराजी स्पष्टपणे झळकली होती. ओबीसी समाजाचा राग दूर करण्यासाठी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांनी भुजबळ यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आपण नाराज नसल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन भुजबळांकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले. मात्र त्यानंतरही ओबीसी समाजाची नाराजी मात्र कायम राहिली आहे.

नाराजी दूर करण्याचे आव्हान
ओबीसी समाजाकडून नाशिकमध्ये द्वारका परिसर तसेच नाशिक रोड विभागात होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. 'आता तरी ऊठ ओबीसी जागा हो' असा मथळा या होर्डिंग्जवर असून, बारा बलुतेदार, धोबी, माळी, सोनार, साळी, शिंपी, वंजारी, धनगर, या महाराष्ट्रात आहे की नाही? आम्ही ओबीसी ७० टक्के आहोत. तरीही तिकीट मिळाले नाही. मतपेटीत आपली ताकद दाखवून द्या', असा मजकूर या होर्डिंग्जवर नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकची जागा राखण्यासाठी ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचे आव्हान महायुतीसमोर असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT