Latest

Lok Sabha Election 2024 – माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार : डॉ. अनिकेत देशमुख

स्वालिया न. शिकलगार

सांगोला : पुढारी वृत्तसेवा – माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घोडामोडींना वेग आला आहे. शेतकरी कामगार पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मी निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा आहे. बैठकीत त्यांनी सांगितले तर शुक्रवारी माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगितले आहे. (Lok Sabha Election 2024 )

आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे बंधू डॉ. बाबासाहेब देशमुख हे उपस्थित होते. यामध्येच डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवण्याची संकेत दिल्यामुळे शेतकरी कामगार पक्षांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशमुख यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टेन्शन वाढलं आहे. 2019 च्या सांगोला विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख अवघ्या 700 मतांनी पराभूत झाले होते. डॉ. अनिकेत देशमुख हे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत.

माढा लोकसभेसाठी देशमुखांनी आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली होती. तसेच आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे नाव चर्चेत होते. त्यांच्या कुटुंबीयांकडून आघाडीचे प्रमुख यांच्याकडे मागणी केली जात होती. परंतु आघाडी कडून धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचे नाव जाहीर केल्याने, डॉ. अनिकेत देशमुख यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याबाबत त्यांना विचारणा केली असता, लोकांची मागणी आणि त्यांच्या भावनांचा आदर करून लोकांनी निर्णय घेतल्यास निश्चितपणे शुक्रवारी माढा लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT